कपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

येवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर कांद्याची पाऊस पडेल या आशेने लागवड केली पण पाण्याअभावी लागवड झालेले रोपे करपून माती होत आहे..यामुळे येवल्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीपातून सुमारे ७० टक्क्यांपर्यंत उत्पन्नाला मुकावे लागणार आहे.

येवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर कांद्याची पाऊस पडेल या आशेने लागवड केली पण पाण्याअभावी लागवड झालेले रोपे करपून माती होत आहे..यामुळे येवल्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीपातून सुमारे ७० टक्क्यांपर्यंत उत्पन्नाला मुकावे लागणार आहे.

मुळातच दुष्काळी असलेल्या तालुक्याला यंदा वरुणराजाने अजूनच मातीत लोटले आहे.अद्यापही मुसळधार पाऊस नसल्याने सर्वत्र नदी-नाले, बंधारे कोरडेठाक आहेत.पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील पन्नासवर गावात खरिपाचे पीक चांगले असले तरी तेथेही पन्नास टक्क्यांपर्यंत हानी होणार आहेच. मात्र अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागातील सत्तरवर गावातील चित्र भयानक आहे.गेल्या वर्षी कटू अनुभव आल्याने कपाशीला बायबाय करत मकाचे क्षेत्र या भागात वाढले पण तीच मका आता केवळ जनावरांच्या चाऱ्यासाठीच शेतात उभी आहे.कारण मकाला बिटाचे तुरे दिसतात पण त्यात दान्यांचा पत्ताच नाही.सर्वात मोठा फटका पांढर्या सोन्याला बसला असून बहरलेल्या कपाशीला जेथे पस्तीस ते चाळीस बोंड असतात त्याच शेतात यंदा चार ते पाच बोंड लागलेले आहे.

कांदा लागवड पाण्यात
सोयाबीनसह इतर सर्वच पिकांचा महिनाभराच्या कडक उन्हाने बळी घेतला आहे.पोळ्याला पाऊस भोळा होतो आणि गणपतीत तर मुसळधार कोसळतो.यामुळे शेतकर्यांनी जुगार खेळत लाल कांदा लागवड केली पण २०-२५ टक्के क्षेत्र वगळता उर्वरित कांदा लागवड रोपे करपल्याने वाया गेली आहे.आता पाऊस पडला तर पिकांना फारसा फायदा होणार नाही.पण पावसाने कृपा करून शेतीला केलेला खर्च मिळावा अशी अपेक्षा उभ्या पिकांकडून शेतकऱ्यांना आहे.

आणेवारी वाढली कशी.?
तालुक्यातील पर्जन्याचे मंडळ निहाय आकडे पाहिले तर येथे पावसाने फक्त सरासरी २५० मिमीचा आकडा गाढला आहे.पिकांची वाट लागली असून आजही ५० गावांना टंकरने पाणीपुरवठा सुरु आहे.तरीही महसूल विभागाने केवळ दोनच गावे ५० पैशांपेक्षा कमी नजर आणेवारीत घेऊन १२२ गावाची आणेवारी अधिक लावल्याने प्रशासनाचे हसू होत आहे.

“शेतातील पिकांची अवस्था पाहवत नसल्याची स्थिती यावर्षी खरीपाची आहे.आलेला दिवस मोठा पाऊस घेऊन येईल आणि यापुढे तरी चांगले काहीतरी दिसेल अन शेतीला लावलेले पैसे तरी मिळातील या अपेक्षतच जातोय.दुष्काळ जाहीर करून सरकारने आधार द्यावा.”
-भावराव भाबड,शेतकरी,राजापूर

खरिपाची अशी झाली पेरणी...
पिक   -- लक्षांक     --  एकूण पेरणी
बाजरी -  ९३२५ -- ८१२९
मका -      ३३६७०-- ३५५९०
तूर -       १६५७-- ९४९
मूग - ३७०१-- ५७९९
उडीद -  ८९०-- ४५६
भुईमुग - ३२५०-- २६०६
सोयाबीन - ३५१४-- ३८५०
कापूस  - ११८९७-- ११५४७
ऊस  - २०-- २३७
एकूण - ६७९२४-- ६९१६४ (१३५ %)

Web Title: because of water shortage crops got spoiled in yeola