बी.एड.ला चार वर्षांनंतर ‘अच्छे दिन’

B.ed
B.ed

अभ्यासक्रम चार वर्षांचा होण्याची चर्चा; खासगी नोकऱ्या वाढल्याचा परिणाम
येवला - प्रवेशक्षमता शंभर अन्‌ वर्गात विद्यार्थी १८, ३२ किंवा फारफार तर ४० असे चित्र गेली चार वर्षे नाशिकसह राज्यभरातील बी.एड. महाविद्यालयांत दिसत होते. यंदा मात्र हे चित्र बदलले असून, चार वर्षांनंतर बी.एड. महाविद्यालयांचे वर्ग फुल होणार आहेत.

सुरक्षित आणि गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची शाश्‍वती असलेल्या शिक्षकीपेशाकडे तरुणाईचा कल वाढलेला दिसतो. बी.एड.ची पदवी संपादन केली, की संस्थाचालक गाठायचा अन्‌ ओळखपाळख काढून नोकरी निश्‍चित करायची, असे चित्र होते. मात्र, २००२ पासून विनाअनुदानित तत्त्व आल्याने ही नोकरी असुरक्षित बनली. किंबहुना चौदा ते पंधरा वर्षे सेवेत असूनही अनेक शिक्षकांना अद्याप पगार सुरू नाही. यामुळे बेभरवशाची ही पदवी २०१२ नंतर अडगळीत पडली आणि महाविद्यालये रिकामे राहू लागली. मागील चार वर्षांतील मंदीच्या दणक्‍याने अनेक महाविद्यालयांना कुलूपदेखील लागले. 

यंदा मात्र हे चित्र बदलले असून, पवित्र पोर्टल, इंग्लिश मीडियममध्ये वाढलेल्या नोकऱ्या आणि पुढील वर्षापासून बी.एड.ची पदवी चार वर्षांची होणार असल्याची चर्चा यामुळे जागांच्या तुलनेत अधिक अर्ज दाखल करत विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षाही दिली आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात एक हजार ५५० जागांसाठी दोन हजार ८०० ते तीन हजार अर्ज दाखल झाले आहेत.

पुनर्वैभवाची कारणे
 पुढील वर्षापासून बी.एड. चार वर्षांचे होणार असल्याची चर्चा
 शासन स्तरावरून पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षकभरती
 गावोगावी सुरू होत असलेले इंग्लिश मीडियम स्कूल
 शहरातील भव्यदिव्य इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल
 खासगी शाळांमुळे वाढलेल्या नोकऱ्या
 स्वतःचे क्‍लासेस व शाळा सुरू करण्याकडे वाढलेला कल

आतापर्यंत प्रवेशाच्या दोन फेऱ्या झाल्या असून, तिसऱ्या फेरीसाठी अर्ज भरणे सुरू आहे. दोन फेऱ्यांत सर्वच महाविद्यालयांतील निम्म्या जागा भरल्या आहेत. या वर्षी रिक्त जागा दिसणार नसल्याचे अंतिम चित्र राहील.
- प्रा. भागवत भड, प्राचार्य, एस. डी. शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बाभूळगाव (ता. येवला)

शासनाच्या धोरणामुळे नोकरीचे चित्र अस्पष्ट असल्याने गेली चार वर्षे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, ‘पवित्र’ची सुरवात आणि खासगी नोकऱ्या वाढल्याने यंदा विद्यार्थिसंख्या वाढली आहे. शिक्षकभरती झाल्यास हा वेग असाच कायम राहील.
- प्रा. ज्ञानेश्‍वर दराडे, अशोका बी.एड. महाविद्यालय, नाशिक

जिल्ह्यात उपलब्ध जागांची स्थिती
एसएनडी, येवला    १००
मातोश्री, एकलहरे    १००
मविप्र, नाशिक    १५०
खातून, मालेगाव    ५०
मोतीवाला, नाशिक    ५०
सिटिझन, मालेगाव    ५०
जेईटी, मालेगाव    ५०
डी. एस. आहेर, देवळा    १००
के. के. वाघ, नाशिक    १००
न्यू बी. एड., नाशिक    ५०
ब्रह्मा व्हॅली, त्र्यंबकेश्‍वर    १००
विश्‍वसत्य, ओझर    ५०
पवार, कळवण    ५०
एम.जी., मालेगाव    १००
सिद्धिविनायक, नांदगाव    ५०
समर्थ, नाशिक    ५०
पीव्हीजी, नाशिक    ५०
अशोका, नाशिक    १००
बहिणाबाई, नाशिक    ५०
मातोश्री, येवला    १००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com