PHOTOS : नारोशंकराची घंटा देते 'या' गावाला पुराचा इशारा 

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

ज्यावेळी नाशिकमधील नारोशंकराच्या घंटेला पुराचे पाणी लागते, त्या वेळी गावात पुराचे पाणी येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जिल्ह्यातील निफाड तालुक्‍यातील नांदूरमध्यमेश्‍वर गाव येथील जवळ असलेल्या पक्षी अभयारण्यामुळे देशभरात ओळखले जाऊ लागले आहे. गावाजवळील 1911 मधील बांधलेले धरण मराठवाड्याची पाण्याची तहान भागविणारे धरण बनले आहे.

नाशिक : गावातील दोनशे वर्षे जुना अहिल्याबाई होळकरांचा सुरेख वाडा आहे. आज या वाड्यात विठ्ठल- रुखमाई, श्रीराम आणि समोरच्या वाड्यात श्रीकृष्ण मंदिर आहे. या वाड्याचा दर्शनी भाग आजही सुस्थितीत असून, आत वाड्याची अवस्था मात्र बिकट आहे. ज्या वेळी नाशिकमधील नारोशंकराच्या घंटेला पुराचे पाणी लागते, त्या वेळी गावात पुराचे पाणी येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

Image may contain: sky, cloud and outdoor

दोनशे वर्षांपूर्वीचा अहिल्याबाई होळकरांचा वाडा गावाची देतो साक्ष 
जिल्ह्यातील निफाड तालुक्‍यातील नांदूरमध्यमेश्‍वर गाव येथील जवळ असलेल्या पक्षी अभयारण्यामुळे देशभरात ओळखले जाऊ लागले आहे. गावाजवळील 1911 मधील बांधलेले धरण मराठवाड्याची पाण्याची तहान भागविणारे धरण बनले आहे. गावाची लोकसंख्या पाच हजार चारशेच्या आसपास असून, गावाच्या बाजूला गोदावरी आणि कादवा नदीचा संगमदेखील बघावयास मिळतो. गावात मध्यमेश्‍वर महाराजांची समाधी आहे. तसेच मृगव्याधेश्‍वर, शनी, राम, सिद्धेश्‍वर, हनुमान, मरीआई, विठ्ठल-रुखमाई, खंडेराव, स्वामी समर्थ ही मंदिरे गावात असून, मंदिरांचे गाव म्हणूनदेखील त्याची ओळख करून देता येईल. महाशिवरात्रनिमित्त गावात मध्यमेश्‍वर मंदिरात मोठी यात्रा भरते. दोन लाख भाविक यात्रेला येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ही यात्रा तीन दिवस सुरू असते. या वेळी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन केले जाते.

Image may contain: outdoor

या गावाची ओळखच लय भारी...

गावात ज्ञानेश्‍वर माउली शिंदे, देवयानी इकडे, अनारसे महाराज कीर्तनकार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत. गावातील भजनी मंडळात मोहन गोसावी, नामदेव शिंदे, जयराम गाजरे, रामदास इकडे, तुकाराम दाते, नंदराम दाते सहभागी होत असतात. गावात लहानू पहिलवान, बाळू माळी, माधव उल्हाडे, नंदराम दाते हे पहिलवान पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. गावात पहिली ते चौथी जिल्हा परिषद व पाचवी ते दहावी मविप्रची शाळा आहे. गावातील गोदावरी सार्वजनिक वाचनालय गावाची शान असून, या वाचनालयात अडीच हजार पुस्तके आहेत. सर्व वृत्तपत्रे गावातील ग्रामस्थांसाठी वाचण्यासाठी ठेवली जातात. वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय राज्यस्तरीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.

Image may contain: indoor

चित्रपटाच्या शूटींगसाठी हे गाव अग्रेसर

गावातील रावसाहेब शिंदे शहीद झाले असून, त्यांच्या नावाने गावातील चौकाला नाव देण्यात आले आहे. गावात वाजंत्री कलाकारदेखील असून, शिवाजी पगारे, राजाराम पगारे आणि त्यांचे सहकारी कलावंत जिल्ह्यात कार्यक्रम करतात. गावात शंभर वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यशवंतराव चव्हाण गावात येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. अलका कुबल आणि फराह या अभिनेत्री चित्रपटाच्या शूटिंगसाठी गावात येऊन गेल्या आहेत. गावाजवळील धरण गाळाने भरले आहे. "पाणी आलं की परिसर पुरात' अशी नवी म्हण परिसरात प्रचलित झाली आहे. गावाजवळील पक्षी अभयारण्याच्या विकास निधीचा एक रुपयादेखील गावाच्या विकासासाठी मिळाला नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात चुली, माठ बनविणारे शिवाजी राऊत हे कारागीर असून, गावाने मध्यमेश्‍वर ट्रस्टदेखील स्थापन केला असून, शांताराम इकडे अध्यक्ष आहेत. 

Image may contain: 4 people, including Pramod Gaikwad, people sitting and indoor

धरणातून मराठवाड्याला पाणी
आमच्या गावाचे नाव देशभरात पोचले असूनसुद्धा अनेक अडचणी गावाला आहेत. उन्हाळ्यात गावात धरण जवळ असूनदेखील पाण्याची अडचण असते. आमच्या धरणातून मराठवाड्याला पाणी दिले जाते आणि आम्ही गाववाले पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करीत आहोत. गावाजवळून नदी, तीन कॅनॉल असून, पाणी दिले जात नाही. मी अनेक वेळा पिण्याच्या पाण्यासाठी उपोषणदेखील केले आहे. - शांताराम दाते, माजी सरपंच 

आमच्या गावाजवळ देशभरातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य असून, या अभयारण्यातील विकास निधी आमच्या गावासाठी एक रुपयादेखील मिळत नाही. गावात अनेक प्राचीन मंदिरे असून, पर्यटन विकासाच्या मोठ्या संधी गावात मिळू शकतात. - हरिश्‍चंद्र भवर, ग्रामस्थ  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bell of NaroShankara gives the warning of Flood to the village Nashik Marathi News