‘गिरणा’चा साठा दोन टक्‍क्‍यांनी वाढला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

नाशिक जिल्ह्यात पडणाऱ्या दमदार पावसाचा परिणाम 

भडगाव - गिरणा पट्ट्यात किती पाऊस पडला त्यापेक्षा गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला का? याची चिंता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असते. दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने गिरणा धरणात काही प्रमाणात पाणी यायला सुरवात झाली आहे. उद्यापर्यंत दोन टक्‍क्‍यांपर्यंत पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे उपअभियंता एस. आर. पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या वाढीमुळे शेतकऱ्यांना सुखद धक्का मिळाला आहे. 

निम्म्या जळगाव जिल्ह्यासाठी गिरणा नदी जीवनदायिनी ठरली आहे. पाणीटंचाईसह शेती भिजवण्यात गिरणा धरणाचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पावसाळ्यात धरण भरण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असते. यंदा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी धरणाच्या टक्केवारीत म्हणाव्या त्या प्रमाणात वाढ झालेली नव्हती. त्यात जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम बहरण्यासाठी व टंचाई दूर होण्यासाठी गिरणा धरणाचा पाणीसाठा वाढणे आवश्‍यक आहे. दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने काही प्रमाणात गिरणा धरणात पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यात ज्या भागात जोरदार पाऊस झाला, त्या भागातील पाणी गिरणेला मिळत नाही. त्यामुळे ज्या प्रमाणात गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ अपेक्षित आहे, त्याप्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता नाही. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात सुरवातीला पाच हजार क्‍युसेसने तर नंतर तो कमी होऊन एक हजार ६०० क्‍युसेसने धरणात ‘फ्लो’ सुरू असल्याचे धरणाचे उपअभियंता एस. आर. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे धरणात उद्यापर्यंत दोन टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असे ते म्हणाले. सध्या धरणात सात हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे २६ टक्के एवढा पाणीसाठा आहे. मागीलवर्षी हे धरण ९० टक्के भरले होते. यंदाही ते भरावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

पुनद धरणातून पाणी सोडले
दरम्यान, गिरणा धरणाच्या वर असलेल्या पुनद धरणातून २ हजार क्‍यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ठेंगोडा बंधारा ‘ओव्हर फ्लो’ होऊन १ हजार ६०० क्‍युसेसचा विसर्ग सुरू आहे. पुनद धरण लाभक्षेत्रात ४० मिलिमीटर तर चणकापूर धरण परिसरात ७० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे पुनद प्रकल्प ५२ टक्के भरला आहे. रात्री पावसाच्या सरी बरसल्या तर धरणात पाण्याचा फ्लो वाढू शकतो. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची गरज आहे.

Web Title: bhadgav jalgav news girana dam water lavel increase