"भगीरथ'च्या माजी विद्यार्थ्यांची अशीही संवेदशीलता 

baghirath school jalgaon
baghirath school jalgaon

जळगाव ः तब्बल 27 वर्षांनंतर भगीरथ इंग्लिश स्कूलमधील माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी एकत्र येऊन स्नेहसंमेलन झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी "कनेक्‍ट' होणे सहज शक्‍य होत असल्याने, त्यातून माजी विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण हा सध्या नित्याचा भाग झाला आहे. तथापि, केवळ एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देताना संवेदनशीलता जपल्याचीही उदाहरणे समोर येत आहेत, असाच एक स्तुत्य उपक्रम भगीरथ इंग्लिश स्कूलमधील 1992 च्या बॅचने राबविला. 

यंदाचे "गेट-टुगेदर' संस्मरणीय व्हावे, यासाठी रूपरेषा आखण्यात येत होती. या बॅचचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सध्या विविध क्षेत्रांत उच्चपदांवर कारकीर्द गाजवत आहेत. मात्र, असे असले तरीही अन्य सर्व गोष्टी बाजूला ठेवून केवळ लहानपण साजरे करण्यासाठी सर्व येणार होते. ठरलेल्या दिवशी सकाळपासून जळगावच्या रॉयल पॅलेस हॉटेलमध्ये ही मित्रमंडळी जमू लागली. एवढ्या वर्षांनी एकमेकांना पाहत असल्याने नव्याने ओळख करून घेणे, हे ओघानेच आले. पण, शाळेतले ग्रुप फोटोंचा उपयोग करून स्टेजवरील बॅकड्रॉप सजवण्यात आला होता. त्यात मी कुठे आहे, हे सर्वच एकमेकांना सांगत होते. असाच एक फोटो पुन्हा घ्यायचा, याबाबतचे नियोजन आधीच ठरलेले होतं. मग, भाऊंच्या उद्यानातील प्रसन्न वातावरणात पुन्हा एक ग्रुप फोटो क्‍लीक झाला. त्यानंतर या सर्व मित्रांनी भन्नाट अविस्मरणीय दिवसाला सुरवात केली. त्यात मग काही खेळ, गाणी, विनोद आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शाळेतील नॉस्टेलजिक आठवणींनी सर्वच 27 वर्षांपूर्वीच्या कालखंडात रममाण झाले. 

अन्‌ संवेदनशीलता जागविली 
सध्याच्या "नाथ प्लाझा'च्या जागी पूर्वीची भगीरथ इंग्लिश स्कूल होती. त्या जागेतील शेवटच्या काही वर्षांतील ही एक बॅच. तेव्हा शाळेचे असलेले "स्ट्रक्‍चर' भन्नाट होते. वर्गखोल्यांची रचनाही अप्रतिम अशीच होती. तेव्हा असलेल्या शिक्षकांची मुलांच्या मनात आदरयुक्त भीती होती. शेजारी असलेल्या नटवर चित्रपटगृहामुळे अनेकदा वेगळाच "चार्म' जाणवायचा, अशा एक ना अनेक आठवणींत दिवस संपला. सर्वांनी एकमेकांचा निरोप घ्यायचा ठरवले, तेव्हा आपल्याला गरजू मुलांसाठी काही करता येईल का? असा विषय पुढे आला. काही मित्रांनी जबाबदारी घेतली आणि त्यातून या बॅचच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींची संवेदनशीलता समोर आली. 

दिव्यांगांना मदतीचा हात 
नेमकी गरजू मुले- शाळा शोधण्याचे काम सुरू झाले. त्यातूनच सिंधी कॉलनीतील अंध- अपंग शाळेतील मुलांना जेवण करण्यासाठी टेबल नसल्याचे लक्षात आले. या शाळेला भेट देऊन कोणत्या आकारातील टेबल करता येतील, याची खातरजमा मित्रांनी करून घेतली. टेबलची उंची, बसण्याच्या बाकांची उंची या सगळ्यांची पडताळणी करून एका उत्तम कारागिराकडून पाच टेबल सेट तयार करून घेण्यात आले. या टेबलचा दर्जा चांगला कसा राहील, याकडेही या ग्रुपने वैयक्तिकरीत्या लक्ष घातले. 

जागतिक अपंग दिनाचे औचित्य! 
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (3 डिसेंबर) सिंधी कॉलनीतील पोलिस ठाण्याला लागून असलेल्या शासकीय बहुद्देशीय अपंग संमिश्र केंद्रात या टेबल सेटचे वाटप "भगीरथ'च्या 1992 च्या बॅचकडून केले जाणार आहे. या दिवशी सर्व अपंग विद्यार्थ्यांसमवेत "भगीरथ'चे माजी विद्यार्थीदेखील जेवण घेणार आहेत. विविध माध्यमांतून समाजाच्या उपयोगी पडण्याचे प्रयत्न माजी विद्यार्थ्यांकडून होताना दिसतात, त्यातीलच हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा ठरेल, याच शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com