भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व आशुमतीबेन शाह विद्यालयास आयएसओ

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 18 मे 2018

"ग्रामीण व आदिवासी भागातील गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांना माफक दरात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हे आमच्या संस्थेचे स्वप्न आहे."
- लक्ष्मीकांत शाह, सचिव, निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व आशुमतीबेन शाह विद्यालय या इंग्रजी व सेमीइंग्रजी, मराठी माध्यमाच्या खाजगी विनाअनुदानित शाळांनी आयएसओ मानांकन प्राप्त करून निजामपूर-जैताणे व साक्री तालुक्यासह धुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संबंधित शाळा या तालुका व जिल्ह्यातील पहिल्याच खाजगी विनाअनुदानित शाळा असल्याचा दावा संचालक मंडळासह मुख्याध्यापक व शिक्षकांनी 'सकाळ'शी बोलताना केला आहे.

गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण...
यासंदर्भात मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष भेट देत शाळेच्या गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतीचे मूल्यांकन केले होते. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार प्राथमिक शिक्षण दिल्याबद्दल नुकतेच शाळेस हे आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले. त्याची मुदत एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२१ पर्यंत असून मार्च २०१९ व मार्च २०२० मध्ये पुन्हा फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. संस्थेने त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज सादर केला होता. संस्थेचे अध्यक्ष प्रमोदचंद्र शाह, उपाध्यक्ष बाबूलाल वाणी, सचिव लक्ष्मीकांत शाह, संचालक दुल्लभ माळी, मोहन सूर्यवंशी, भिकनलाल जयस्वाल, सुमंतकुमार शाह, राजेंद्र राणे, वासुदेव बदामे आदींसह मार्गदर्शक प्राचार्य मदनमोहन शिंदे, मुख्याध्यापक मनोज भागवत, आनंद सोनवणे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत.

सातशे विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन...
या शाळांत एकूण सातशे विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असून संस्थेने सन १९९२ मध्ये 'भानुबेन वाणी शिशु संस्कार केंद्र' नावाने शाळेची सुरुवात केली. सन २००९ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कुलची स्थापना केली. त्यात सद्या इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग असून चालू वर्षापासून 'सीबीएसई पॅटर्न' लागू केला आहे. सन २०१३ मध्ये मराठी माध्यमाच्या श्रीमती आशुमतीबेन शाह विद्यालयाची स्थापना केली. तीत सद्या पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून चालू वर्षापासून सेमी-इंग्रजीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. प्रतीक्षा आहे ती फक्त शासकीय अनुदानाची.

विशेष पायाभूत सुविधांची निर्मिती...
शाळेत तीन डिजिटल क्लासरूम, संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मुख्याध्यापक दालन, शिक्षक दालन व कार्यालय आदींसह सर्व क्लासरूम ए.सी.आहेत. विद्यार्थ्यांसाठी वॉटर फिल्टरचे शुद्ध पाणी व आधुनिक पद्धतीच्या स्वच्छतागृहांचीही सोय केली आहे. शालेय परिसरासह सर्व वर्गखोल्या ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्कुल बसची सुविधाही उपलब्ध असून माळमाथा परिसरातील खेड्या-पाड्यांसह थेट साक्रीहून मुले येथे शिकायला येतात हे विशेष. शाळेत सुमारे ४० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून शाळा सकाळ, दुपार अशा दोन सत्रात भरते. सद्या शाळेच्या तीन एकर परिसरात १२ वर्गखोल्या उपलब्ध असून शालेय इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

Web Title: Bhanuben Wani Public School and Ashumatiben Shah Vidyalay to ISO