भास्कराचार्यांच्या कर्मभूमीत होणार पहिली गणितनगरी

आनन शिंपी
रविवार, 30 एप्रिल 2017

सरकारला प्रस्ताव सादर; मंजुरीनंतर होणार कामाला सुरवात, वनखात्याचे सहकार्य

सरकारला प्रस्ताव सादर; मंजुरीनंतर होणार कामाला सुरवात, वनखात्याचे सहकार्य
चाळीसगाव - जगाला शून्याची ओळख करून देणाऱ्या भास्कराचार्यांनी ज्या जागी शून्याचा शोध लावला, त्या पाटणादेवी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे जागतिक दर्जाची गणितनगरी होणार आहे. त्याद्वारे गणितात संशोधन करणाऱ्यांसह अभ्यासकांना माहितीचे नवे दालन उपलब्ध होणार आहे. गणित विषयासाठी समर्पित आयुष्य वेचणाऱ्या भास्कराचार्यांना त्यांच्याच कर्मभूमीत साकार होत असलेली ही गणितनगरी खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे मत अभ्यासक व्यक्त करतात.

चाळीसगावपासून नैऋत्यला 17 किलोमीटरवर पाटणादेवी निसर्गरम्य ठिकाण आहे. 1864 मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी पाटणादेवी परिसराला भेट दिली आणि अल्लाउद्दीन खिलजीने उद्‌ध्वस्त केलेल्या चंडिकादेवी मंदिरातील शिलालेख शोधला. या शिलालेखामुळेच गणिततज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हे बाराव्या शतकात होऊन गेले आणि ते या परिसरात वास्तव्यास होते, हे सिद्ध झाले.

गणितसूर्य भास्कराचार्य प्रतिष्ठानचे सचिव राजेश ठोंबरे म्हणाले, भास्कराचार्यांच्या नावाने या जागेवर अभिमानाने दाखवता येईल आणि भावी पिढीला अभ्यासता येईल अशी गणितनगरी उभी राहावी, यासाठी सातत्याने स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे यासंबंधी चर्चा केली असता, त्यांनी हा विषय तडीस नेण्याचा निर्धार केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी 2015-16 च्या अर्थसंकल्पात जागतिक दर्जाची गणितनगरी पाटणादेवी येथे करण्याची घोषणा केली आहे.

संमेलनामुळे मिळाली चालना
पाटणादेवी येथे 23 ऑक्‍टोबर 2015 ला गणितसूर्य भास्कराचार्य जीवन व कार्य परिचय संमेलन आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून झाले. त्यात "भास्कराचार्यांचे गणित' या विषयावर प्रा. श्रीराम चौथाईवाले (यवतमाळ), तर दुसऱ्या सत्रात प्रा. मोहन आपटे (मुंबई) यांचे "भास्कराचार्यांचे खगोलशास्त्र' या विषयावर व्याख्यान झाले. संमेलनास उपस्थित शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमोर गणितनगरीचा विषय आल्यानंतर त्यांनी या कामाला चालना दिली.

अशी असेल गणितनगरी
पाटणादेवीचा परिसर गौताळा अभयारण्यात येतो. वन विभागाच्या माध्यमातून गणितनगरी साकारली जाईल. सध्या वापरात नसलेल्या वन विभागाच्या जुन्या इमारतींमध्ये सुधारणा घडवून माहितीची विविध दालने सुरू होतील. याशिवाय भास्कराचार्य कुटीया, वस्तुसंग्रहालय, गणित संशोधन केंद्र, सिद्धार्थ शिरोमणी ग्रंथदालन, तारांगण, प्रेक्षागृह, विश्रामगृह यांसह पर्यटकांच्या व विशेषतः गणित अभ्यासकांच्या दृष्टीने आवश्‍यक सुविधा गणितनगरीत असतील.

विद्यापीठाद्वारे अभ्यासक्रम
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पुढाकार घेऊन भास्कराचार्य आणि वैदिक गणित यांच्यावरील स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी विद्यापीठातच भास्कराचार्यांच्या नावाने स्वतंत्र ग्रंथदालनही सुरू होणार आहे. त्यामुळे गणितासंदर्भातील संशोधनाला चालना मिळेल.

भास्कराचार्यांचे वेगळेपण
पायथागोरस प्रमेयाचा सोपा सिद्धांत, पृथ्वीचा परीघ निश्‍चित करण्याची सुलभ पद्धत, अनंत या संख्येची उत्तम व्याख्या, वर्तुळात नियमित बहुभुजाकृती कंपासाशिवाय रेखाटण्याची पद्धत अशी "लीलावती' ग्रंथाची खास वैशिष्ट्ये आहेत. भास्कराचार्य काळाच्या फार पुढे होते. आज "पेल्स इक्वेशन' म्हणून जे समीकरण ओळखले जाते, ते भास्कराचार्यांनी 1150 मध्ये चक्रवाल पद्धतीने सोडविले. तेच समीकरण सोडविण्यासाठी युरोपीय गणितज्ज्ञांना सुमारे 600 वर्षे वाट पाहावी लागली. 1769 मध्ये जोसेफ लुई लॅंग्राज या फ्रेंच गणितज्ज्ञाने ते समीकरण सोडविले. "कॅलक्‍युलस'मधील "लिमिट' आणि "डिफरन्सिएशन'ची कल्पना भास्कराचार्यांना आली होती. त्यांची लेखन पद्धती सुरस, काव्यमय आणि शिस्तबद्ध, तर विषयांची मांडणीही अतिशय रेखीव आहे.

गणितनगरी निर्माण करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. आराखडा तयार झाला, की लवकरच कामकाजाला सुरवात होईल.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

गणित या विषयासाठी अत्यंत आदराने नाव घेतले जाते, ते भास्कराचार्यांचे. त्यांचे व इतरही गणितज्ज्ञांचे कार्य जगापुढे यावे, या उद्देशाने गणितनगरीच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. त्यासाठी सरकार आणि समाज पाठीशी राहील, असा विश्‍वास आहे.
- प्रा. ल. वि. पाठक, अध्यक्ष, गणितसूर्य भास्कराचार्य प्रतिष्ठान, चाळीसगाव.

Web Title: Bhaskaracharya will be in the workshop for the first maths city