
Dhule News : सांगवी परिसरात भोंगऱ्या बाजारात पारंपरिक वेशभूषेत आदिवासी नृत्य
वकवाड (जि. धुळे) : शिरपूर तालुक्यातील सांगवीसह आदिवासी (Tribal) गाव-पाड्यात भोंगऱ्या बाजाराची घूम सुरू आहे.
नोकरी व रोजगारासाठी स्थंलातरित झालेली कुटुंबेही भोंगऱ्या, होळी, रंगपंचमी, मेलादा उत्सव साजरा करण्यासाठी गावी पोचली आहेत. त्यामुळे आदिवासी गाव-पाडे गजबजले आहेत. (Bhongra Bazar has started in tribal villages Sangvi in Shirpur taluka dhule news)
सांगवी येथील भोंगऱ्या बाजार परिसरातील सर्वांत मोठा भोंगऱ्या बाजार भरतो. तो पाहण्यासाठी आदिवासी तरुणांत सकाळपासून प्रचंड उत्साह दिसून आला. युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते.
काही परिसरातील गाव-पाड्यांतील आदिवासी बांधवांनी मोठ्या आकाराचे ढोल, तिरकामठा, बासरी, कास्याची गिरमी आदी वाद्यांच्या गजरात हजारो बांधवांनी नृत्य करून संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन घडविले.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
पारंपरिक नृत्याने वेधले लक्ष
भोंगऱ्या बाजारात बहुतांश तरुणाईने एकसारखे ड्रेस व पारंपरिक पोशाख परिधान केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले. तरुण-तरुणी घोळका करीत ढोल-ताशांच्या गजरात नृत्याचा फेर धरीत एकच जल्लोष करीत असल्याचे दिसून आले.
उत्सवात सहयोग सरपंच कनीलाल पावरा, उपसरपंच अरुणाबाई कोळी, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, पंचायत समिती सदस्या प्रभाबाई कोकणी, सरपंच मगन आर्य, सदस्य जामसिंग पावरा, जबरसिंग पावरा, दिनेश धानका, साहेबराव कोकणी, नीलेश जाधव, रेणुकाबाई पावरा, आशाबाई कोकणी, भारतीबाई भिल, भुरीबाई भिल, ग्यानसिंग पावरा व सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी उपस्थित होते.