
Dhule News : भोंगऱ्या उत्सवास थाटात प्रारंभ; लोकगीत गायन व बासरीवादन, लाखो रुपयांची उलाढाल
वकवाड (जि. धुळे) : आदिवासी बांधवांसाठी आनंदाची पर्वणी असणाऱ्या भोंगऱ्या उत्सवास (Festival) बुधवारी पनाखेड, दहिवद व कोळीद येथे थाटात सुरवात झाली. (Bhongrya festival of joy for tribal brothers started with grandeur on Wednesday dhule news)
या उत्सवात सहभागी झालेले समाजबांधव व तरुणाईने लोकगीत गायन, बासरीवादन व ढोलवादनाचे विविध प्रकार व नृत्याविष्कार सादर करीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. पनाखेड गावाचा आठवडेबाजाराचा दिवस होता.
त्या दिवसी हा भोंगऱ्या बाजार भरला. उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करण्याचे मोठे ठिकाण आहे. सायंकाळी उशिरापर्यत सुरू असलेल्या या उत्सवात आदिवासी बांधवांची गर्दी दिसून आली. दिवसभरात या उत्सवात लाखो रुपयांची उलाढाल झाली.
विविध वेशभूषांनी वेधले लक्ष
सकाळपासूनच सातपुड्याच्या डोंगर-दऱ्यांतून व परिसरातील गावांमधील आदिवासी युवक-युवती विविध वेशभूशा करून आले होते. आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून, तर काही मिळेल त्या वाहनातून या उत्सवात सहभागी झाले होते.
गावाजवळच्या पाड्यांतून येणाऱ्या आदिवासी बांधवांनी मोठ्या आकाराचा ढोल, तिरकामठा, कांस्याची गिरमी, बासरी आदी साहित्य सोबत आणले होते. दुपारनंतर या उत्सवात आदिवासी समाजबांधवांची प्रचंड गर्दी उसळली होती. आदिवासी तरुण-तरुणींनी केलेला पोशाख व काहींनी कंबरेभोवती आकर्षक शाली गुंडाळल्या होत्या.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
पारंपरिक कार्यक्रमांचे सादरीकरण
भोंगऱ्या उत्सवात सहभागी झालेल्या आदिवासी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. आदिवासी संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन येथे तरुणाईने सर्वांना घडविले. येथील भोंगऱ्या बाजारात यंदा परिसरातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावली. पारंपरिक आदिवासी गीतांसह गटागटाने नृत्य सादर करून भोंगऱ्या उत्सवात आणखीनच रंगत आणली होती. पारंपरिक कार्यक्रम सादर करून जल्लोषात भोंगऱ्या बाजाराची सांगता झाली.
गर्दीने फुलला बाजार
भोंगऱ्या भाजार पाहण्यासाठी खास मध्य प्रदेश सरहद्दीवरील गावपाड्यातील डोंगर-दऱ्यांत राहणारे व बाहेरगावाहून आदिवासी मंडळींनी हजेरी लावली होती. आदिवासी महिला व तरुणींनी वस्त्रालंकार तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली.
पारंपरिक पद्धतीचे कपडे व दागदागिन्यांच्या दुकानांसह लहान मुला-मुलींसाठी व स्वतःसाठी कपडे खरेदी करताना आदिवासी बांधव दिसून आले. पनाखेड गावामधून धुळे-इंदूर महामार्ग असल्यामूळे भोंगऱ्या बाजार मुख्य ग्रामपंचायत पटांगणात व खैरखुटी रस्त्याचा दुतर्फा पाळणे व झुल्यांसह दुकाने थाटली होती. भोंगऱ्या बाजारात होळीसाठी प्रसाद म्हणून डाळ्या, फुटाणे, साखरेचे हारकडे खरेदी समाजबांधवांनी केली.
गैरसोय टाळण्याचे प्रयत्न
सरपंच करवटीबाई पावरा, उपसरपंच वनसिंग पावरा, माजी सरपंच शिवदास भिल, सदस्य मेरसिंग पावरा, भिका चारण, सामाजिक कार्यक्रता खुमसिंग पावरा, एकनाथ भिल, सखाराम भिल, पोलिस पाटील रवींद्र पावरा, भिसन पावरा आदींनी भोंगऱ्यात आलेल्या बांधवांची गैरसोय होणार नाही याबाबत विशेष काळजी घेतली. भोंगऱ्या बाजारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सांगवी पोलिस ठाण्याचे कर्मचारी नजर ठेवून होते.