नाशिकमध्ये दराडेंच्या यशात भुजबळांचा वाटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

संघटनात्मकदृष्ट्या खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादीमध्ये उत्साह निर्माण करण्याबरोबर मित्रपक्षांत विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यात भुजबळांची उपस्थिती किती महत्वाची होती याचे उत्तर दराडेंच्या प्रतिक्रियेमागे दडले नाही ना? असा प्रश्‍न राजकीय विश्‍लेषक उपस्थित करु लागले आहेत.

नाशिक : आपल्या यशामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतरांचा वाटा आहे, अशी उस्फूर्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील यशानंतर व्यक्त केली. फाटाफुटीच्या राजकारणात दराडे यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. त्यामागे कारणही मतांचे असून शिवसेनेने स्वतःच्या 167 मतांवरुन 399 मतांपर्यंत मजल मारलीय.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यात शिवसेनेतून हकालपट्टी झालेले  अॅड. शिवाजी सहाणे यांना पक्षात सामावून घेत उमेदवारी दिली. खरे म्हणजे, भाजपमध्ये अस्वस्थ असलेले आमदार डॉ. अपूर्व हिरे अन्‌ त्यांचे बंधू अद्वय हिरे या दोघांनी या साऱ्या प्रक्रियेत लावलेली उपस्थिती जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार हे स्पष्ट झाले होते. पण त्याचवेळी सुरवातीपासून नाशिकचे पालकत्व स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपची रणनिती भरकटलेल्या वारुसारखी सुरवातीपासून राहिली. अॅड. सहाणे हे एकीकडे उमेदवारीसाठी भाजपकडे लॉबिंग करत होते. 

दुसरीकडे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले परवेझ कोकणी मालेगावच्या भरवश्‍यावर भाजपच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. पण पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचे कारण देत भाजपने इच्छुकांना झुलवत ठेवले. हे कमी काय म्हणून मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपने कोकणींना वाऱ्यावर सोडत हिरे कुटुंबियांनी समर्थन दिलेल्या अॅड. सहाणेंना मतदान करण्याचा फतवा आपल्या 167 मतदारांना सोडले. पण तत्पूर्वी राजकीय उलथापालथीच्या पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

भुजबळांच्या सुटकेनंतर खिळल्या नजरा

छगन भुजबळ यांची जामिनावर तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात नेमकी काय भूमिका राहणार याकडे नजरा खिळल्या होत्या. अॅड. सहाणे, कोकणी यांच्यासह दराडे यांच्या समर्थकांनी भुजबळांची भेट घेतली. अॅड. सहाणे हे भेटायला गेल्यावर सगळ्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला भुजबळांनी दिला होता.

जिल्ह्याच्या राजकारणात भुजबळांचा वरचष्मा असताना नरेंद्र दराडे हे मूळचे त्यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातील आहेत. दराडेंनी राजकीय जीवनाला कॉंग्रेसपासून सुरवात केली. पुढे भुजबळांच्या समर्थनासाठी दराडे खुलेआम उभे राहिले होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात दराडेंना "म्हाडा'चा "लालदिवा' मिळाला होता. अर्थात, त्यामागे भुजबळ होते हे सर्वश्रूत आहे. 

भुजबळ तुरुंगात असताना त्यांच्या भेटीगाठी दराडे कुटुंबिय घेत राहिलेत. के. ई. एम. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर प्रकृतीच्या कारणास्तव भुजबळांच्या जंगी स्वागताचा कार्यक्रम समर्थकांनी रद्द केला. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर भुजबळ निवासस्थानी थांबले आणि मतदानाला काही दिवसांचा कालावधी उरला असताना त्यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेण्यास सुरवात केली. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे शहर-जिल्ह्यामध्ये आघाडीचा मोर्चा सांभाळत राहिले.

संघटनात्मकदृष्ट्या खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादीमध्ये उत्साह निर्माण करण्याबरोबर मित्रपक्षांत विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यात भुजबळांची उपस्थिती किती महत्वाची होती याचे उत्तर दराडेंच्या प्रतिक्रियेमागे दडले नाही ना? असा प्रश्‍न राजकीय विश्‍लेषक उपस्थित करु लागले आहेत.

दराडेंना व्यक्तिगत संपर्क आला उपयोगी

दराडे हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये असले, तरीही अन्‌ नंतर भुजबळांना समर्थन देत राहिले तरीही त्यांचा इतर पक्षातील नेते-कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संपर्क राहिला आहे. त्यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, जिल्हा बँक अन्‌ जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रीय असलेल्यांचा समावेश आहे. भुजबळांच्या अनुपस्थितीत झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात शिवसेना-कॉंग्रेस, भाजप-राष्ट्रवादी असा घरोबा राहिला. 

अशातच, मागील विधानपरिषद निवडणुकीत भुजबळांचे समर्थक अन्‌ मावळते आमदार जयवंत जाधव यांच्या उमेदवारीच्या विरोधात दंड थोपटून उभे असलेल्या विविध पक्षांमधील नेत्यांची भूमिका आता मात्र "मवाळ' राहिली. राज्यात अन्‌ केंद्रात युती असली, तरीही नाशिक महापालिकेच्या राजकारणात शिवसेना-भाजपमधील सख्ख्य केंव्हाच मावळलेले होते. शिवाय आताही भाजपने शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी अॅड. सहाणे यांना समर्थन देण्याच्या घेतलेल्या भूमिकेतून दराडेंना उमेदवारी देण्याच्या शिवसेना नेत्यांच्या निर्णयातून फाटाफुटीची बिजे रोवली गेलेली शिवसेना एकजीव राहिली, असे निकालावरुन स्पष्ट होते. विशेष करुन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भूमिका शिवसेनेसाठी निर्णायक ठरली. या निकालातून अंतर्गत कुरबूर कितीही असली, तरीही शिवसेनेत 'आदेश' पाळला जातो, हे भाजपच्या विरोधाच्या भूमिकेमुळे अधोरेखित झाले. 

दरम्यान, भाजपची पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाशिकची मदार होती. पण बदलेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना पालघरमध्ये मुक्काम ठोकावा लागला अन्‌ "पार्टी विथ डिफरन्स'चा नारा देणाऱ्या भाजपच्या नाशिकमध्ये ठिकऱ्या उडाल्या. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पुढे काय झाले हेही त्यांच्या नाशिकमधील सहकाऱ्यांनी दाखवून दिले.

Web Title: Bhujbals contribution to in Nashik Success of Darade