दुचाक्‍या चोरणारे बंटी-बबली गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नाशिक : नाशिकमध्ये दुचाकी चोरायची आणि ती चाळीसगावातील चोरट्याला विक्री करणारे बंटी-बबलीसह आणखी दोघांना सरकारवाडा पोलिसांनी शिताफीने अटक केली. संशयितांकडून 2 लाख 60 हजार रुपयांच्या दहा दुचाक्‍या हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. 

नाशिक : नाशिकमध्ये दुचाकी चोरायची आणि ती चाळीसगावातील चोरट्याला विक्री करणारे बंटी-बबलीसह आणखी दोघांना सरकारवाडा पोलिसांनी शिताफीने अटक केली. संशयितांकडून 2 लाख 60 हजार रुपयांच्या दहा दुचाक्‍या हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. 

सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव या गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरट्यांच्या मागावर होत्या. यातील एक संशयित दीपक साईदास राठोड (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) हा चाळीसगावच्या रेल्वेस्टेशन परिसरात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथक घेऊन संशयिताला मालेगाव रोड, चाळीसगाव येथून सापळा रचून अटक केली.

पोलीस चौकशीतून त्याने नाशिकमधून चोरीच्या दुचाक्‍या घेऊन त्या ग्रामीण भागात विकत असल्याची माहिती दिली. त्यानुसार, नाशिकमधून संशयित प्रकाश कांतिलाल सूर्यवंशी (19, रा. तांबट लेन, नाशिक), पूजा किशोर मोरे (22, रा. आरटीओ कॉर्नर, पवार लॉन्स, श्रीधर कॉलनी, पेठरोड) या दोघा बंटी-बबलीला अटक केली. तसेच चोरीच्या दुचाक्‍या माहिती असतानाही त्या खरेदी करणाऱ्या सागर अनिल देशमुख (रा. चाळीसगाव) यासही अटक करण्यात आली आहे.

संशयितांकडून चोरीच्या 2 लाख 60 हजार रुपयांच्या 10 दुचाक्‍या हस्तगत करण्यात आल्या आहेत. यात दोन बजाज पल्सर, दोन पॅशन प्लस, 3 स्प्लेंडर, 1 हिरो आयस्मार्ट, 1 बजाज सीटी100, 1 ऍक्‍टिवा दुचाकींचा समावेश आहे. नाशिक, जळगाव, औरंगाबाद, मालेगाव, कोल्हापूर या शहरातूनही बंटी-बबलीसह संशयित राठोड याने दुचाक्‍यांची चोरी केली आहे.

 ही कामगिरी सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सारिका आहिरराव, उपनिरीक्षक बैरागी, हवालदार चंद्रकांत पळशीकर, ठाकूर, खरपडे, देशपांडे, वाघमारे, मरकड, जगदाळे यांच्या पथकाने बजावली.

Web Title: Bike Thieves Bunty-Babli in jail