पक्षांना भेडसावणाऱ्या टंचाईचे काय?

सुधाकर पाटील
सोमवार, 30 एप्रिल 2018

फक्त माणसांच्या टंचाईच्या उपाययोजना करणाऱ्या प्रशासनाला मुक्या पक्षाची टंचाई का दिसत नाही? असा प्रश्न सध्याच्या उन्हाच्या तडाख्यामुळे समोर आला आहे.

भडगाव - माणसांची पाणीटंचाई दुर करण्यासाठी प्रशासनाकडुन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. अगदी टॅंकरलाही पाणी उपलब्ध झाले नाही. तर रेल्वेने इतर भागातून पाणी आणण्याची किमया दोन वर्षापुर्वी लातुरात साध्य झाली. मात्र फक्त माणसांच्या टंचाईच्या उपाययोजना करणाऱ्या प्रशासनाला मुक्या पक्षाची टंचाई का दिसत नाही? असा प्रश्न सध्याच्या उन्हाच्या तडाख्यामुळे समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबर, स्वयंसेवी संस्थांनी पक्षांना पाणी व अन्न उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र आहे.   

सध्या उष्णतेच्या पार्याने पंचेचाळीशी गाठली आहे. त्यामुळे माणसं जीव मुठीत धरून वावरता आहेत. काही गावांना तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवघड बनला आहे. अशा परिस्थिती पक्षांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही ऐरणीवर आलेला आहे. पक्षांना पाण्याअभावी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. माणसांच्या टंचाई सोडविण्याबरोबर पक्षांची ही टंचाईकडे प्रशासनाने गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. 

पक्षांच्या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष 
जिल्ह्यात सद्य:स्थितीला 859 गावात टंचाई आहे. काही गावांना टंचाई ने उग्र रूप धारण केले आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडुन उपाययोजना करते आहे. काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. एकुणच माणसांची टंचाई दुर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. पण पक्षी टंचाई आहे म्हणून मोर्चा काढु शकत नाही, ना कोणाजवळ तक्रार करू शकत नाही म्हणून की काय त्यांची टंचाई दुर करण्यासाठी प्रशासनाने काहीएक पाऊले उचलेली दिसत नाही. ऐरवी पक्षी हे नदी, नाले, तलाव, धरणातून पाण्याची तहान भागवितात. मात्र सद्य:स्थितीला ठराविक धरण सोडले तर नदी, नाले, तलाव कोरडेठक आहे. शेतात ठणठणाठ आहे. अशा परिस्थिती पक्षी या पंचेचाळीसीच्या पाऱ्यात सैरभैर झाल्याचे चित्र आहे. त्यांना खायला काही नजरेस पडत नाही. ही परिस्थिती अवघ्या जिल्ह्यात नव्हे तर संपुर्ण राज्यात उन्हाळ्यात पाहायला मिळते. त्यामुळे फारसे पक्षीच दिसेनासे झाले आहेत. 

भुतदया दाखवणे गरजेचे 
माणसांच्या टंचाईसाठी प्रशासन ज्या पध्दतीने उपाययोजना करते त्याप्रमाणे पशुपक्षांच्या टंचाईसाठीही उपाययोजनेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. याबरोबरच स्वयंसेवी संस्थांनी ही अशा परिस्थितीत एकपाऊल पुढे टाकयला हवे. काही ठिकाणी संस्था, मंडळ यासाठी पुढे सरसावले आहेत. पाचोर्यात एका ग्रुप ने तहसिलदार कार्यालयाच्या आवारात पक्षासाठी पाण्याचे भांडे ठेवले आहे. तर दोन वर्षापुर्वी डामरूण (ता. चाळीसगाव) एका शेतकऱ्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पाण्याचे भांडे लावले होते, दररोज ते त्यात पाणी टाकायचे. किमान उन्हाळ्यात अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास पक्षांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

नागरीकांनी किमान उन्हाळ्यात भुतदया म्हणून आपल्या घरासमोर वा छतावर मातीच्या भांड्यात पक्षांसाठी पाणी ठेवायला हवे. याशिवाय त्यांना खाण्यासाठी धान्य ठेवले तर निश्चितच पक्ष जतन होण्यास हातभार लागेल.  - अश्विन पाटील (पक्षीमित्र, अमळनेर)

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Birds suffer because lack of water