भाजपला मुद्दे गवसले; विरोधकांचे मुद्दे हरवले

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

उत्तर महाराष्ट्र विश्लेषण

उत्तर महाराष्ट्र नगराध्यक्ष
भाजप- 8,
शिवसेना-7,
कॉंग्रेस-1,
युती-1, 
आघाडी- 4

उत्तर महाराष्ट्र विश्लेषण

उत्तर महाराष्ट्र नगराध्यक्ष
भाजप- 8,
शिवसेना-7,
कॉंग्रेस-1,
युती-1, 
आघाडी- 4

नाशिक-  राजकारणात यशाची फुटपट्टी निवडणुकीतील यश ठरवते. सत्तेच्या जादुच्या छडीची त्यात हमखास मदत होते.  त्यामुळे जो जिंकतो तो जल्लोष करतो अन्‌ हरतो तो तक्रारी करतो. नगरपालिका निवडणूकीच्या निकालानंतरही उत्तर महाराष्ट्रातच काय पण राज्यभरातही हेच घडते आहे. एकंदरच या निवडणुकांत सत्ताधाऱ्यांनी नवी राजकीय मांडणी केल्याने त्यांना मुद्दे गवसले अन्‌ विरोधकांचे हरवले. त्याचा शॉक दोन्ही कॉंग्रेसला विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात बसला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील पंधरा नगरपालिकांच्या निवडणूकांत भाजपचे रमण भोळे (भुसावळ), महानंदा डोले (फैजपुर), अनिता येवले (सावदा), आशालता चव्हाण (चाळीसगाव), रमेश परदेशी (एरंडोल), करण पवार (एरंडोल), मोतीलाल पाटील (शहादा), नयनकुँवर रावल (दोंडाईचा) अशा आठ नगरपालिकांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. जनक्रांती आघाडीचे दारा मोहंमद ( रावेर), अंमळनेरला पुष्पलता पाटील, चोपडा येथे मनीषा चौधरी या तीन जागांवर स्थानिक आघाड्या, शिवसेनेचे संजय गोहिल (पाचोरा) आणि सुरेखा कोळी (यावल), सलीम पटेल (धरणगाव) या तीन तर शिरपूरला कॉंग्रेसच्या जयश्रीबेन पटेल यांच्या माध्यमातून अमरीशभाई पटेल यांनी कॉंग्रेसची लाज राखली. 

नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणूकांत भाजपच्या सदस्यसंख्येत किंचित वाढ झाली असली तरी त्यांना कुठेही लक्षणीय विजय संपादन करता आलेला नाही. शिवसेनेने मात्र अनिता करंजकर (भगूर), किरण डगळे (सिन्नर), राजेश कवडे (नांदगाव), पद्‌मावती धात्रक (मनमाड) या चार नगरपालिकांत नगराध्यक्ष तसेच लक्षणीय जागा मिळविल्या. सटाणा येथे स्थानिक विकास आघाडीचे सुनील मोरे तर येवल्यात शिवसेना- भाजप युतीचे बंडू क्षिरसागर निवडून आले. उत्तर महाराष्ट्रातील एकवीस नगरपालिकांत भाजप 8, शिवसेना (भगूर, नांदगाव, मनमाड, सिन्नर, पाचोरा आणि यावल)  6, शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार येवलामध्ये तर शिरपूर, धरणगाव या ठिकाणि कॉंग्रेसचे दोन जण नगराध्यक्ष झाले, तर स्थानिक आघाड्यांचे सटाणा, रावेर, अंमळनेर, चोपडा या ठिकाणी चार नगराध्यक्ष झाले. भाजपचे सर्वाधिक 135 नगरसेवक निवडून आले. स्थानिक आघाड्यांचे 121, शिवसेना- 106, कॉंग्रेस-58, राष्ट्रवादी कॉंग्रेस 54, अपक्ष- 46, एमआयएम-4 तर मनसेला केवळ 1 जागा मिळाली. 

या निवडणुकीत स्थानिक नेत्यांची प्रतिमा, प्रतिष्ठा अन्‌ मोठ्या प्रमाणातील लक्ष्मीदर्शन हे मुद्दे निकालावर प्रभाव टाकुन गेले. नाशिकमध्ये शिवसेनेने लक्षणीय यश मिळवले त्यात स्थानिक नेत्यांचा प्रभाव व जुळवाजुळव त्यांच्या कामी आली. भाजपने मोठ्या प्रमाणात इतर पक्षांतील "इनकमिंग' घेतले. त्याला लक्ष्मीदर्शनाची जोड असल्याचे आरोप राजकीय नेत्यांनी केले. मात्र, एकंदरच त्यात कोणताही पक्ष मागे नव्हता. काळ्या पैशांविरोधात केंद्र शासनाने नोटबंदीचे पाऊल उचलले. त्याचा प्रचार व सामान्यांवरील प्रभाव याच काळात दिसून आला. मात्र, दोन्ही कॉंग्रेसने सबंध प्रचारात या विषयावर मौन बाळगले होते. केंद्रात याच विषयावर वरिष्ठ नेते आक्रमक असतांना नाशिकमद्ये स्थानिक पातळीवर या पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी निवडणुकीतही स्लीपींग मोडमध्ये होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही तोच कित्ता गिरवला. 

भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या  प्रचार सभा घेतल्या. जळगावमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदी कमबॅक करण्यासाठी परिश्रम घेतले. गिरीष महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पूर्ण ताकद लावली होती. त्याचे माप विजयाच्या रुपाने त्यांच्या पदरात पडले. भाजप पहिल्या क्रमांकावर राहीला. अमरीश पटेल, शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले गड राखले. माजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अटकेत असल्याने त्यांच्या मतदारसंघातील नांदगाव, मनमाड, येवल्याची निवडणूक त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाला गमवावी लागली. असाच झटका माजी राज्यमंत्री हेमंत देशमुख यांनाही बसला. एकंदर काय तर विरोधकांचे मुद्दे अन्‌ सूर दोन्ही हरवल्याने या निवडणुकीचा नूरच पालटला. भाजप, शिवसेनेच्या स्थानिक नेते मतदारांवर आपली प्रतिष्ठा व प्रभाव टाकण्यात यशस्वी झाले.

Web Title: bjp gets valid points in local elections