भाजप सरकार विरोधकांना करतंय 'ब्लॅकमेल'- प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मदत न करणारे शासन​

"भाजप शासन कोणालाही मदत न करणारे शासन आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा मोबदला अद्यापही दिलेला नाही. गरीबांची रोजगार हमीची कामे उन्हाळ्यात सुरूच केली नाहीत."

- प्रकाश आंबेडकर

जळगाव : 'विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या हातात 'चिट्ठे' ठेवून भाजप सरकार त्यांना ब्लॅकमेल करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही भाजपला मदत करीत आहेत. यात काँग्रेस पक्ष 'टार्गेट'वर आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला धाकधुकीवर ठेवले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष भरीव विरोध न करता थातूरमातूर विरोध करीत आहेत. अशा प्रकारामुळे मात्र सध्याचे राजकारण एका धोकदायक वळणावर आहे,' असे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले आहेत. जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलतांना अॅड. आंबेडकर म्हणाले, 'भाजप शासन कोणालाही मदत न करणारे शासन आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा मोबदला अद्यापही दिलेला नाही. गरीबांची रोजगार हमीची कामे उन्हाळ्यात सुरूच केली नाहीत. समाजकल्याण खात्याचा निधी बंद केले, मुलांना देणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्त्याही बंद करण्यात आल्या आहेत. शिक्षण लिमिट करण्याचा धंदा या सरकारचा आहे.'

दोन वर्षांत कामच नाही
राज्यातील शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की राज्यातील शासनाने दोन वर्षात राज्यात कोणतेही चांगले काम केलेले नाही. आपले त्यांना अवाहन आहे, त्यांनी एकतरी काम केले असल्याचे दाखवून द्यावे.

लोकशाही नव्हे हिटलरशाही
भाजप सरकराची लोकशाही नव्हे हिटलरशाही सुरू आहे. भाजप सरकार ब्लॅकमेल करून काँग्रेसपक्ष संपविण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कारवाईचा दंडुका दाखवून त्यांच्यात धाकधुक निर्माण केली जात आहे. भाजपची ही हिटलरशाहीच सुरू आहे. या अगोदर देशात व राज्यात असलेल्या सरकारानीं असा प्रकार केलेला नाही. मुलायमसिंग असा प्रकार करून त्यावेळी भाजपचे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे नेतृत्व संपवू शकत होते. परंतु त्यांना ते केलेले नाही. ब्लॅकमेलिंगच्या या प्रकारामुळे राजकारण आज धोकादायक वळणावर आहे.

संघटनांनी पुढे येण्याची गरज
भाजपच्या या ब्लॅकमेलिंग प्रकारामुळे सर्वच पक्ष गर्भगळीत झाले आहेत. असे मत व्यक्त करून ते म्हणाले, कि राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस केवळ थातूरमातूर विरोध करीत आहेत.जर त्यांनी विधिमंडळातच विरोध केला असता,बजेट अधिवेशनात सरकारवर कटमोशन आणले असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मिळून जास्त आमदार झाले असते व सरकार पराभूत झाले असते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला असता. पक्षाचा विरोध संपल्यामुळे आज खऱ्या अर्थाने संघटनानी पुढे येण्याची गरज आहे. त्यांनी आता सत्ताधाऱ्याविरूध्द एकत्रीत येवून विरोध करण्याची गरज आहे.

अधिकारी भाजपला ब्लॅकमेलिंग करतील
राज्यातील राजकीय ब्लॅकमेलिंगचा भाजपचा प्रकार गंभीर असल्याचे मत व्यक्त करून अॅड.आंबेडकर म्हणाले, आज भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ब्लॅकमेलीग करीत आहेत. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढून कारवाईची धमकी देत आहे. परंतु उद्या अधिकारी वर्ग भाजपलाच 'ब्लॅकमेलिंग'करून त्यांची भ्रष्टाचाराची लक्तरे बाहेर काढण्याची धमकी देईल. त्यामुळे ही बाब धोकादायक आहे.

Web Title: BJP govt blackmailing opponents, blames prakash ambedkar