भाजपचे बलस्थान "केडर' अस्तित्वाच्या शोधात 

भाजपचे बलस्थान "केडर' अस्तित्वाच्या शोधात 

जळगाव : गेल्या पाच वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता काबीज केलेल्या भाजपची या सत्ताकाळातील वाटचाल कॉंग्रेसच्या दिशेने झाली असून, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत संघटनेतील पदाधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींच्याच मताला महत्त्व दिले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे बलस्थान असलेले "केडर'च धोक्‍यात येण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवरील प्रचारक ही संकल्पना राजकीय पक्ष म्हणून भाजपत संघटनमंत्री या पदाच्या माध्यमातून पुढे आली. जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्ष अशा वाटचालीत बूथ, मंडळ अशा विविध आघाड्यांवर भाजपच्या संघटनात्मक पदावरील कार्यकर्त्यांनी जिवाचे रान अन्‌ रात्रीचा दिवस करून "केडरबेस्ड्‌' अशी पक्षाची ओळख निर्माण केली. त्यामुळे अनेक वर्षे विरोधात राहूनही भाजपचा संघटनात्मक विस्तार कधीही थांबला नाही की, कमीही झाला नाही. त्यातूनच केंद्रात दोन ते दोनशे आणि गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तर भाजपने तीनशे जागांपर्यंत मजल गाठली आणि राज्यात भाजपचा मुख्यमंत्रीही विराजमान होऊ शकला. 

बेरजेच्या राजकारणात "केडर' बाजूला 
मात्र, गेल्या दशकभरात, विशेषत: केंद्र व राज्यातील पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपचे बलस्थान असलेले हेच संघटनात्मक "केडर' दुर्लक्षित झाले. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर बेरजेच्या राजकारणात अन्य पक्षातील नेते, कार्यकर्ते भाजपशी जोडले गेले खरे, मात्र त्यातून जुने निष्ठावंत अन्‌ उपरे असा संघर्ष निर्माण झाला. कमी-अधिक प्रमाणात तो अख्ख्या राज्यात सार्वत्रिक आहे. विशेष म्हणजे, केंद्र व राज्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजपने याच बेरजेच्या राजकारणातून ताब्यात घेतल्या. त्यातून भाजपचे "केडर' बाजूला पडल्याचे चित्र दिसत आहे. 

लोकप्रतिनिधींचे महत्त्व वाढले 
साधारण 2010-14 पर्यंत पक्षात संघटनेतील पदाधिकाऱ्यांना विशेष महत्त्व होते. संघात प्रचारक व पक्षात संघटनमंत्री हे तर अतिमहत्त्वाचे पद. आमदार-खासदारच नव्हे तर मंत्रीही या संघटनमंत्र्यांचा सन्मान करताना दिसत. गेल्या पाच-सात वर्षांत हे चित्र बदलले आहे. सत्तेची फळे चाखताना लोकप्रतिनिधींचे महत्त्व वाढून संघटनमंत्र्यांचे महत्त्व घटल्याचे बोलले जात आहे. निर्णय प्रक्रियेतही आता कॉंग्रेसप्रमाणेच भाजपतही लोकप्रतिनिधींच्या मताचा प्रभाव जाणवतो, असे संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी बोलू लागले आहेत. 

पक्षश्रेष्ठींना अंतर्मुख करणारा दाखला 
यासंदर्भात संघटनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेला दाखला बोलका अन्‌ पक्षश्रेष्ठींना अंतर्मुख करणारा आहे. तो पदाधिकारी म्हणाला, "मुलांना घडविताना आईने शिक्षा केली तर त्याला वाईट वाटत नाही, कारण रागावलेली आई लगेच मुलास जवळ घेऊन मायेचा हातही फिरवते.. पण, शिक्षकाने शिक्षा केली, तर विद्यार्थ्यास नैराश्‍य येते. सध्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची शिक्षकाने शिक्षा केलेल्या विद्यार्थ्यांसारखी स्थिती आहे.. पक्षातील आईची जागा प्रत्येक ठिकाणी शिक्षकानं घेतलीय...' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com