त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी नाकारले सुरेश जैन यांचे नाव; खडसेंचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

दिवाळीनिमित्त जळगावातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांच्या एकत्रीकरणात ते बोलत होते.  जुन्या स्मृती सांगताना त्यांनी हा किस्सा सांगितला. प

जळगाव : 1999 मध्ये युतीला बहुमतासाठी दहा आमदार कमी पडत असताना त्या वेळी सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करावे, अशी शिफारस घेऊन आपण नितिन गडकरींसोबत बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो होतो, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.

दिवाळीनिमित्त जळगावातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांच्या एकत्रीकरणात ते बोलत होते.  जुन्या स्मृती सांगताना त्यांनी हा किस्सा सांगितला. पण, राज्याची सत्ता व्यापारी प्रवृत्तीच्या हाती सोपवायची नाही, असे बाळासाहेबांनी त्यावेळी बजावल्याचे खडसे यांनी सांगितले.

 खडसे याबाबत म्हणाले, '1999मध्ये भाजप सेना युती म्हणून लढले, आणि काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे. त्या वेळी युतीचे 135 आमदार निवडून आले होते. बहुमतासाठी 10 आमदारांची गरज होती. पण, केवळ 2 -3 अपक्ष आमदारांच्या बळावर 145 चा आकडा गाठता येत नव्हता. त्या वेळी सुरेशदादा जैन यामनी बहुमत कसे मिळवता येईल हे नितिन गडकरींना पटवून दिले आणि तो प्रस्ताव आणि जैन यांची मुख्यमंत्रीपदासाठीची शिफारस घेउन आम्ही मातोश्रीवर गेलो होतो. पण, बाळासाहेबांनी त्यास नकार दिला. त्यावेळी त्यांची विचार करण्याची उंची किती श्रेष्ठ आहे हे समजले आणि त्यांचा आदर अधिक वाढला.'

त्या वेळी जैन यांच्याशी टोकाचा विरोध असूनही आपण केवळ युतीच्या मुख्यमंत्री व्हावा म्हणून हा प्रयत्न केला. पण, त्यानंतर तब्बल 15 वर्षे युतीचे सरकार येऊ शकले नाही, असे खडसे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader eknath khadse once recommended suresh jain for cm post