पंकजा, रोहिणी यांना पक्षांतर्गत हितशत्रूंनी पाडले : एकनाथराव खडसे

कैलास शिंदे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पंकजा मुंडेसह भाजपतच अस्वस्थता आहे. पंकजा या निवडणुकीत पराभूत झालेल्या नाहीत. त्यांना पाडण्यात आले, असे त्यांचे मत आहे. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरातूनही ऍड. रोहिणी खडसे यांना पाडण्यात आले.

जळगाव : पंकजा मुंडे, ऍड. रोहिणी खडसे यांचा पराभव झालेला नाही. पक्षांतर्गत कारवाया करून त्यांना पाडण्यात आले. ज्यांनी अंतर्गत हे कारस्थान केले आहे, त्यांची नावे आम्ही पक्षाकडे दिलेली आहेत. मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पंकजा मुंडेसह राज्यात अनेक जण अस्वस्थ आहेत. येत्या 12 डिसेंबरला काय निर्णय होणार, याची प्रतीक्षा करा. आपणही गोपीनाथ गडावर जाणार आहोत, असे खळबळजनक विधान भाजप नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी "सकाळ'शी बोलताना केले. 

श्री. खडसे आज जळगावात आले होते. शिवरामनगरातील "मुक्ताई' या निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा केली. पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, की पंकजा मुंडेसह भाजपतच अस्वस्थता आहे. पंकजा या निवडणुकीत पराभूत झालेल्या नाहीत. त्यांना पाडण्यात आले, असे त्यांचे मत आहे. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरातूनही ऍड. रोहिणी खडसे यांना पाडण्यात आले. पक्षांतर्गत कारवाया करून हेतुपुरस्सरपणे त्यांना पाडण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्यांनी हे काम केले, त्यांची नावे आम्ही पुराव्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे दिलेली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांनी अद्यापही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे पक्षात अस्वस्थता आहे. मला राज्यातून अनेक अस्वस्थ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोन आले आहेत. 

दुर्लक्षित असल्याची भावना 
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांशी नेत्यांनी आपुलकीने कोणीही चर्चा केलेली नाही. पराभव झाल्याबाबतची कारणमीमांसाही नेतृत्वाने केलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोणीही विचारीत नाहीत, अशी भावना पराभूतांमध्ये आहे. त्यामुळेही ते सर्वच जण अस्वस्थ आहेत. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. पक्षाच्या नेत्यांनी पराभूत झालेल्यांना बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करावी. 

हेही वाचा > पक्ष बळकटीसाठी शिरीष चौधरी मंत्रीमंडळात? 

बारा तारखेची प्रतीक्षा करा 
पंकजा मुंडे या अस्वस्थ असल्यामुळे त्या काय निर्णय घेणार हे आपल्याला माहिती नाही, परंतु त्या पक्षांतराचाही निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे बारा डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. आपण गोपीनाथ गडावर जाणार काय? या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, की (कै.) गोपीनाथ मुंडे असताना आपण अनेक वेळा भगवान गडावर गेलो आहे. मात्र आता जर पंकजा मुंडेंनी बोलावले, तर आपण बारा डिसेंबरला गोपीनाथ गडावर जाणार आहोत. तथापि, आपला पक्षांतर करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

क्‍लिक करा > सारंगखेडा चेतक महोत्सवाचा करार रद्द

निधी परत जाऊ शकत नाही 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 80 तासांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात 40 हजार कोटींचा निधी केंद्राला परत केला. या भाजप खासदारांच्या आरोपाला उत्तर देताना खडसे म्हणाले, की केंद्रातून राज्यात आलेला कोणताही निधी परत जाऊ शकत नाही. अगदी पंतप्रधानांनी ठरविले, तरी असा निधी परत करता येत नाही. आपण राज्याचे अर्थमंत्री होतो, त्यामुळे आपल्याला हे बोलण्याचा अधिकार आहे. निधी हा परत जात नाही. तो अखर्चिक होतो आणि त्यासाठी मोठी प्रोसिजर असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp pankja munde rohini khadse marathi news jalgaon