भाजपने राखली जळगावची जागा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, खानदेश विकास आघाडी अशा सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्यामुळे विजयी होऊ शकलो. मुख्यमंत्री देवेंद्रजी, नाथाभाऊ, गिरीशभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढल्याने कोणतीही अडचण आली नाही. पक्षाचा कार्यकर्ता व या मतदारसंघातील जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून मी विकासासाठी सदैव प्रयत्न करेल.
- चंदुलाल पटेल, नवनिर्वाचित आमदार

जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजप उमेदवार चंदुलाल पटेल यांचा मोठ्या मताधिक्‍याने अपेक्षित असा एकतर्फी विजय झाला. श्री. पटेल यांना 421, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार ऍड. विजय पाटील यांना 90 मते मिळाली. अन्य सहा अपक्ष उमेदवारांपैकी एक उमेदवाराला केवळ एक तर पाच उमेदवारांना भोपळाही फोडता आला नाही.

या निवडणुकीत प्रथमच भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची मर्जी डावलत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयास उमेदवारी दिल्यामुळे महाजनांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना, मनसे आदी प्रमुख पक्षांनी उमेदवारी मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सात अपक्ष उमेदवार रिंगणात कायम होते, त्यामुळे निवडणूक अपरिहार्य झाली. त्यासाठी शनिवारी जळगाव जिल्ह्यातील विविध 7 मतदानकेंद्रांवर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली होती. एकूण 549 मतदारांपैकी 546 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात मतमोजणीस प्रारंभ झाला.

दीड तासातच चित्र स्पष्ट
मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी साडेनऊपर्यंत अवघ्या दीड तासात निकालाचे चित्र स्पष्ट होऊन भाजप उमेदवार पटेल यांनी विजयी आघाडी घेतली. दुपारी साडेअकराला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती रूबल अग्रवाल यांनी उमेदवारनिहाय मते जाहीर करून श्री. पटेल यांना विजयी घोषित केले.

चौतीस मते बाद
मतमोजणीच्या सुरवातीला वैध व संशयास्पद मते वेगळी करण्यात आली. संशयास्पद मतांचे निरीक्षण करून त्यातून बाद होत असलेली 34 मते बाजूला काढण्यात आली. वैध मतांच्या 512 या संख्येनुसार विजयासाठी आवश्‍यक कोटा 257 मतांचा ठरविण्यात आला. हा निश्‍चित केलेला कोटा पटेल यांनी पहिल्या फेरीच्या मतांमध्येच पार केल्याने ते विजयी ठरले.

उमेदवारनिहाय मते
चंदुलाल पटेल (भाजप) : 421
ऍड. विजय पाटील (अपक्ष) : 90
शेख अखलाक शे. युसूफ : 1
बाद मते : 34 (एकूण मतदान 546)

यांच्या नावे भोपळा
निवडणुकीतील अपक्ष उमेदवार जावेद इक्‍बाल अ. रशीद, देवरे सुरेश रूपचंद, प्रशांत अरविंद पाटील, श्‍याम अशोक भोसले, नितीन दत्तात्रय सोनार या पाचही जणांच्या नावापुढे मतमोजणी संपेपर्यंत भोपळाच राहिला. एकही मत त्यांना मिळू शकले नाही.

Web Title: bjp party secure Jalgaon place in vidhan parishad election