भाजपच्या काटाकाटीच्या पतंगाला जिल्हा नेत्यांचा ढील!

संतोष विंचू - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

येवला - पालिका निवडणूक होऊन पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष होतो न होतो तोच पुन्हा एकदा येथील पक्षांतर्गत गटबाजीने जोर पकडला आहे. इतके दिवस शहर व तालुक्‍यातच एकमेकांची पतंग काटण्याचा उत्सव सुरू असताना आता जिल्हा नेतेही या काटाकाटीला ढील देऊ लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बदलवलेला तालुकाध्यक्ष हे याच काटाकाटीत एक तुटलेला, तर एक सापडलेला पतंग आहे.

पालिका निवडणुकीत युती होऊन जिल्ह्यातील सर्व जागा गमावलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवसेनेमुळे येथे ‘अच्छे दिन’ आले अन्‌ थेट नगराध्यक्षपद मिळाले. फारसे संघटन नसताना शहरात पक्षाचे तीन-चार गट कार्यरत असून, याची झलक पालिकेच्या निवडणुकीत युती व जागावाटपातील राड्यातून दिसली. शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी एक पाऊल मागे घेत उमेदवारी केली नाही. या बदल्यात त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्दही देण्यात आला होता. जेव्हा वेळ आली तेव्हा भाजपतूनच राजकीय शह करीत हे पद काही तासांतच बेपत्ता करीत शिंदे व सहकाऱ्यांना धक्का देण्यात आला.

या पहिल्या अंकानंतर आता ज्येष्ठ नेते प्रमोद सस्कर यांनी ताकद वापरून एकनाथ साताळकर यांना तालुकाध्यक्ष पदाची खुर्ची दिली होती. अर्थात, साताळकर यांनी या पदाला न्याय दिला नाही. पण, पालिकेत शहराध्यक्षाला डावलले म्हणून नस्तनपूर मेळाव्याचा संदर्भ देत निष्क्रियतेचा ठपका ठेवत साताळकर यांना अचानकपणे हटविण्यात आले आहे. अर्थात, यासाठी काळकर, पाटील, चव्हाण, शिंदे, गायकवाड अशा मोठ्या नावांचेही योगदान लाभल्याचे समजते. नूतन अध्यक्ष राजू परदेशी हे सक्रिय कार्यकर्ते असून, उमदा चेहरा पक्षाला मिळाला असल्याने याचा फायदा होणार आहे. जिल्हा नेत्यांनीही ढील देऊन पतंग काटाकाटीत योगदान देण्यापेक्षा गटा-तटाचे राजकारण थांबविले तरच पक्षाला ‘अच्छे दिन’ येतील.

Web Title: BJP politics yeola