भाजपची स्वबळावर सत्ता आणा - उदय वाघ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

जळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता स्वबळावर आणावयाची आहे. कार्यकर्त्यांनी त्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केले आहे. पक्षाच्या जळगाव तालुका बैठकीत ते बोलत होते.

जळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता स्वबळावर आणावयाची आहे. कार्यकर्त्यांनी त्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केले आहे. पक्षाच्या जळगाव तालुका बैठकीत ते बोलत होते.

कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग प्रेस येथे भारतीय जनता पक्षाची तालुका बैठक झाली. जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पवार, आमदार सुरेश भोळे आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात गट व गणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी काही इच्छुक उमेदवारांनी आपला परिचय दिला.

जिल्हाध्यक्ष उदय वाघ म्हणाले, की जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सर्व गट व गणांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. पक्षाची उमेदवारी ज्याला मिळेल, त्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या मताधिक्‍याने निवडून आणावे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही उमेदवार भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. जळगाव तालुक्‍यात पाचही गट भाजपचेच निवडून येऊ शकतात. पक्षाची स्वबळावर सत्ता येऊ शकते, त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागावे.

आमदार सुरेश भोळे म्हणाले, की प्रत्येक कार्यकर्त्याने आपण स्वतः उमेदवार आहे असे समजून जोमाने काम करावे. जिल्हा सरचिटणीस पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संजय भोळे यांनी केले. सूत्रसंचालन राजू सोनवणे यांनी केले. यावेळी मार्केट कमिटीचे संचालक बंडू पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष वाघ यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: bjp power in zp