भाजप-शिवसेनेत युती व्हावी - एकनाथराव खडसे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

जळगाव - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला विरोध करून भाजपने स्वबळावरच लढावे, असा आग्रह नेहमीच धरणारे तसेच विधानसभा निवडणुकीत युती तोडण्यासाठी पुढाकार घेणारे भाजप नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना- भाजपने युती करावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य आज दिवसभर चर्चेचा विषय ठरले.

जळगाव - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला विरोध करून भाजपने स्वबळावरच लढावे, असा आग्रह नेहमीच धरणारे तसेच विधानसभा निवडणुकीत युती तोडण्यासाठी पुढाकार घेणारे भाजप नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना- भाजपने युती करावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य आज दिवसभर चर्चेचा विषय ठरले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच जळगावच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपची जिल्हा कार्यालयात बैठक झाली. यावेळी श्री. खडसे ते म्हणाले, की आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होण्याची गरज आहे. युती झाली, तर आपल्याला निश्‍चित आनंद  होईल. जिल्हा परिषदेत एकूण ६७ जागा आहेत. युती झाल्यास दोन्ही पक्ष मिळून ६० जागा येतील. मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळून युतीची पुन्हा सत्ता येईल. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट होईल, त्यामुळे युती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

सत्ताधारी म्हणून जबाबदारी
श्री. खडसे म्हणाले, की जिल्हा परिषदेत पंधरा वर्षांपूर्वी वाय. जी. महाजन भाजपचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यानंतर भाजपचीच सत्ता कायम राहिली आहे. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली आहे. आता तर केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे सत्ताधारी म्हणून जिंकण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. 

सत्तेत बोलण्यात निर्बंध
विरोधी पक्षात असताना बोलण्यास कोणतेही निर्बंध नव्हते, असे सांगत श्री. खडसे म्हणाले की त्यावेळी केवळ सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात आम्ही जोरदार अस्त्र चालवीत होतो. परंतु आता सत्तेत आल्यानंतर बोलण्यास निर्बंध आहेत. आता उलट सरकारने केलेली कामे जनतेला सांगावी लागत आहेत. सत्तेत आल्यानंतर परिवर्तन होत असते. कार्यकर्त्यांना लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या आहेत. काही बाहेरच्या कार्यकर्त्यांनाही पक्षात घेऊन पदे द्यावी लागतात. यश मिळविण्यासाठी ते करावेच लागते. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यश मिळविण्यासाठी बाहेरचा उमेदवार असला, तरी कार्यकर्त्यांनी तो स्वीकारला पाहिजे. 

पक्षहिताआड मैत्री नकोच
श्री. खडसे यांनी सांगितले, की आपण पक्षबांधणीसाठी कार्य करीत असताना केवळ पक्षाचे हितच पाहिले. त्यासाठी मैत्री कधीही आड येऊ दिली नाही. त्याच बळावर आज पक्ष मोठा झाला आहेत. यावेळी महाजन यांना उद्येशून ते म्हणाले, की आपणही पाचोऱ्यात आपली असलेली मैत्री कमी करा, पक्षाला निश्‍चितच फायदा होईल. 

प्रकल्पपूर्ती न झाल्याची व्यथा
खडसे यांनी यावेळी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मंजूर केलेल्या योजना नंतर पूर्ण न झाल्याबद्दल व्यथा व्यक्त केली. ते म्हणाले, की आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेले अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव रखडला नाही. जिल्ह्यात व्हेटर्नरी कॉलेजला मंजुरी दिली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. केळी टिश्‍यूकल्चर प्रकल्पाची मंजुरी रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री पाटील यांनी हे प्रकल्प कार्यान्वित करण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: The BJP-Shiv Sena alliance