शिवसेनेच्या जखमेवर भाजपचे मीठ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नाशिक - गल्लीपासून दिल्लीपर्यंत शत-प्रतिशतचा नारा देणाऱ्या भाजपने मित्रपक्ष शिवसेनेची संघटनात्मक पातळीवर कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिकेत सर्वांत मोठी कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या अध्यक्षपदाचा वाद सुरू असतानाच परस्पर अध्यक्षपदाची घोषणा झालेले नगरसेवक प्रवीण तिदमे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे मानून आज त्यांचा स्थायी समितीत सत्कार करण्यात आला. भाजपच्या सत्काराची भूमिका वरकरणी सामंजस्याची वाटत असली तरी शिवसेनेतील अंतर्गत वादाला खतपाणी घालण्याचा भाग मानला जात आहे.

महापालिकेत सर्वांत मोठी व प्रबळ संघटना म्हणून शिवसेना प्रणीत म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचा दबदबा आहे. एकूण सात हजारांपैकी चार हजारांहून अधिक सदस्य असलेल्या संघटनेचे अध्यक्षपद माजी नगरसेवक ॲड. शिवाजी सहाणे यांच्याकडे होते. पण गेल्या आठवड्यात नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे अचानक अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. तिदमे यांना एचएएल कामगार संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असल्याचे कारण त्यामागे दिले गेले. तिदमे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अध्यक्षपदाची घोषणा केली. पण नियमाप्रमाणे कार्यकारिणी सदस्यांची बैठक होते व त्यात अध्यक्षपदाचा एकमताने निर्णय घेतला जातो अशी आतापर्यंतची प्रथा आहे. त्यामुळे तिदमे यांची संघटनेच्या अध्यक्षपदावरची नियुक्ती घटनेला धरून नसल्याचा वाद शिवसेनेत सुरू आहे. 

एकीकडे वाद सुरू असतानाच भाजपनेही त्याचा फायदा घेत शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी तिदमे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केल्याने सेनेंतर्गत वादाला खतपाणी घालण्याचा प्रकार मानला जात आहे.

भाजपला हवी संघटनेवर पकड
म्युनिसिपल कामगार-कर्मचारी संघटना महापालिकेतील सर्वांत मोठी संघटना आहे. सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांशी संबंधित असलेली संघटना असल्याने पक्षाची ध्येयधोरणे संघटनेतर्फे लोकांपर्यंत सहजपणे पोचविण्याचे प्रबळ माध्यम होऊ शकते. त्यामुळे संघटनेत शिरकाव करण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: BJP , Shiv Sena politics