युतीचा "हच्चा' राखून स्वबळाची खेळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

जळगाव - जिल्हापरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज भाजप व शिवसेना या सत्तेतील दोघा पक्षांच्या स्वतंत्र जिल्हा बैठका झाल्या. वरिष्ठ पातळीवरुन युतीबाबत निर्णयासाठी प्रयत्न होत असताना दोघा पक्षाच्या नेत्यांनी आज (ता.21) बैठकांमधून कार्यकर्त्यांना स्वबळावर सत्ता मिळविण्याचे आवाहन केले. भाजपने चाळीसपेक्षा जास्त जागांवरील विजयाचा निर्धार केला तर दुसरीकडे शिवसेनेने पाच गटांचे उमेदवारही जाहीर करुन टाकले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युतीच्या शक्‍यतेचा "हच्चा' राखून दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीने वाटचाल करीत असल्याचे दिसून आले.

जिल्हापरिषदेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातली असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली असून त्याअंतर्गत आज भाजप व शिवसेनेने स्वतंत्रपणे जिल्हा बैठका घेत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

स्वबळाची खेळी
पालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हापरिषद निवडणुकीतही यश मिळविण्याचे आवाहन भाजपच्या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, संघटनमंत्री किशोर काळकर यांनी केले. 67 पैकी चाळीसपेक्षा जास्त नव्हे तर पन्नास जागा मिळविण्याचा निर्धार करा, असे महाजन म्हणाले. तर उदय वाघ यांनीही पत्रकार परिषदेत "40 प्लस'चे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे, असे स्पष्ट केले.

सेनेचे पाच उमेदवार घोषित
दरम्यान, शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत जिल्हापरिषद निवडणुकीसाठी पाच गटांचे उमेदवार घोषित करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेनेही स्वबळाच्या दृष्टीनेच वाटचाल सुरु केल्याचे मानले जात आहे. संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत भाजपवर टीका करत, भाजपच प्रमुख विरोधक असल्याचे संकेत दिले.

पालिकेतील यश सांघिक
पालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळविले. जिल्ह्यातील यश हे कार्यकर्त्यांची मेहनत व सांघिक स्वरुपाचे आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही यशाची हीच पताका फडकत राहील, असा विश्‍वास आहे.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री.

सत्ता, पैशाची भाजला गुर्मी
सत्ता व पैशाच्या जोरावर पालिका निवडणुका जिंकल्या म्हणून भाजपने गुर्मीत राहू नये. भाजपच्या धोरणांमुळे सामान्य नागरिक त्रस्त, तर शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे जिल्हापरिषद निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल.
- रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख, शिवसेना.

Web Title: bjp shivsena separate meetings