भाजपचा विजय पराभूतांना आत्मपरीक्षण करायला लावणारा 

भाजपचा विजय पराभूतांना आत्मपरीक्षण करायला लावणारा 

नामपूर - बागलाण तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या प्रभावी नामपूर गटात तिसऱ्यांदा शत-प्रतिशत कमळ फुलल्यामुळे भाजपने हॅट्ट्रिक साधली. एकेकाळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपला कडवी झुंज दिली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेच्या जोरावर भाजपने नामपूर गटात आपले अस्तित्व कायम ठेवून गड शाबूत ठेवला आहे. विकासाची फळे चाखण्यासाठी नामपूरकरांनी शत-प्रतिशत सत्तेत राहणे पसंत केले आहे. गटातील भाजपचा विजय पराभूत उमेदवारांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. 

नामपूर गटावर सुरवातीला कॉंग्रेसचे प्राबल्य होते. डॉ. प्रभाकर निकम, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक सावंत, गुलाबराव कापडणीस, (कै.) रमेश कुलकर्णी आदींनी नामपूर गटाचे प्रतिनिधित्व केले. गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून नामपूर गटाची ओळख निर्माण झाली. 2007 मध्ये भाजपचे विक्रम मोरे, तर 2012 मध्ये सुनीता पाटील यांनी नामपूर गटाचे नेतृत्व केले. यंदा गट पुन्हा एकदा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने अनेकांची स्वप्ने धुळीस मिळाली. यंदा भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. गटातील भाजपच्या प्रभावामुळे कॉंग्रेसचे विधानसभेचे उमेदवार सोमनाथ सोनवणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेश केला; परंतु भाजपने मोराणे येथील निष्ठावान कार्यकर्ते तथा भाजप आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष कन्हू गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सोमनाथ सोनवणे शिवबंधनात अडकले. गायकवाड यांनी सोनवणे यांचा दोन हजार 850 मतांच्या फरकाने पराभव केला. सोनवणे यांच्या 2007 च्या विधानसभा पराभवानंतर गेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुशीला सोनवणे यांचा नामपूर गणात पराभव झाला होता. पराभवाची मालिका खंडित होत नसल्याने आगामी काळात राजकीय निष्ठा गमावून बसलेले सोनवणे राजकीय संन्यास घेण्याची दाट शक्‍यता आहे. 

अंबासन गणात अतिशय चुरशीची लढत झाली. भाजपचे युवानेते जिभाऊ कोर यांच्या पत्नी शीतल कोर अवघ्या 37 मतांनी विजयी झाल्या. अंबासन गावाला दुसऱ्यांदा विजयाचा मान मिळाला. नामपूर बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रकांत कोर यांच्या मातोश्री सुशीला कोर (शिवसेना) यांचा निसटता पराभव झाला. श्रीपुरवडे येथील माजी सरपंच जगन्नाथ पवार यांच्या पत्नी निर्मला पवार यांना सर्वांत कमी मते मिळाली. भाजपचा झालेला निर्विवाद विजय हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते तथा प्रचारप्रमुख अण्णासाहेब सावंत यांनी "सकाळ'ला दिली. या विजयात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. शेषराव पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भदाणे, युवानेते अविनाश सावंत, प्रचारप्रमुख अण्णासाहेब सावंत, डॉ. संजय सावंत, डॉ. दिकपाल गिरासे, शहराध्यक्ष दीपक सोनवणे, रूपेश शहा, किरण ठाकरे, भाऊसाहेब अहिरे, श्‍यामराव गायकवाड, हेमंत कोर आदींचा मोलाचा वाटा आहे. 

"ते' उमेदवार खड्याप्रमाणे बाहेर 
मटका, चकली पकली, ऑनलाइन लॉटरी यांसारखे अवैध व्यवसाय करणाऱ्या उमेदवारांना सुज्ञ मतदारांनी खड्यासारखे दूर केले आहे. माजी ग्रामपंचयात सदस्य रमेश सोनवणे यांना सर्वांत कमी 171 मते मिळाली. नामपूर गणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब सावंत यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या कल्पना सावंत यांनी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कापडणीस यांच्या पत्नी संगीता कापडणीस (शिवसेना) यांचा 500 मतांनी पराभव केला. सहकारमहर्षी (कै.) जयवंतराव सावंत यांच्या गटाच्या भक्कम पाठिंब्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुरेखा खैरनार यांना सर्वांत कमी 612 मते मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com