धुळ्याच्या महापौरपदी भाजपचे चंद्रकांत सोनार बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

भाजपचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर नगरसेविका कल्याणी अंपळकर यांची उपमहापौरपदी आज बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला.

धुळे : भाजपचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर नगरसेविका कल्याणी अंपळकर यांची उपमहापौरपदी आज बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 74 पैकी 50 जागा जिंकत भाजपने महापालिकेवर सत्ता मिळवली होती. या  विजयानंतर आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार पीठासीन अधिकारी होते, आयुक्त सुधाकर देशमुख उपस्थित होते. महापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्याची घोषणा करत अधिकृतरित्या उमेदवारी मागे घेतली. शहर विकासासाठी जनतेने भाजपला कौल दिला असल्याचे म्हणत उमेदवारी माघार घेत असल्याचे व भाजपला पाठिंबा देत असल्याचे गटनेते कमलेश देवरे यांनी सांगितले. 

त्यामुळे त्यामुळे भाजपचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. उपमहापौर पदासाठीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्याने भाजपच्या कल्याणी अंपळकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यानंतर भाजपने घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

Web Title: BJP's Chandrakant Sonar elected Mayor of Dhule