Election Results : धुळ्यात 'डॉ. भामरे एक्‍स्प्रेस' सुसाट! 

Subhash Bhamre
Subhash Bhamre

धुळे : विखारी प्रचारातून चारित्र्यहननाचा प्रयत्न, पंतप्रधानांच्या विशेष निधीतून मंजूर सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना आणि मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाबाबत भूसंपादन झालेले नसतानाही येथे निवडणुकीपूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व याकामी पुढाकार घेणारे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे थापेबाज आहेत, अशा त्यांच्या विरोधकांच्या आरोपांकडे मतदारांनी सपशेल दुर्लक्ष करत डॉ. भामरे एक्‍स्प्रेस सुसाट पळविली आहे. तिचा पिच्छा करणेही कॉंग्रेस महाआघाडीला शक्‍य झाले नसल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. 

लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी येथील शासकीय गुदामात मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. यात गेल्या 29 एप्रिलला 10 लाख 79 हजार 748 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पैकी आतापर्यंत 10 लाख 61 हजार 517 मतांची मोजणी झाली आहे. या स्थितीत भाजप महायुतीचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना सहा लाख तीन हजार 23, तर कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांना तीन लाख 72 हजार 738 मते मिळाली होती. भाजपचे बंडखोर नेते माजी आमदार अनिल गोटे यांना आठ हजार 316, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांना 38 हजार 854 मते मिळाली आहेत. 

डॉ. भामरेंवर विश्‍वास व्यक्त 
या स्थितीत मंत्री डॉ. भामरे यांना दोन लाख 30 हजार 285 चे मताधिक्‍य मिळाले आहे. शेवटच्या फेरीनंतर अंतिम आकडेवारी समोर येऊ शकेल. डॉ. भामरे यांना लाखाचे मताधिक्‍य मिळेल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले होते. त्यापेक्षा अधिक मताधिक्‍य डॉ. भामरे यांना मिळत आहे. प्रचारातून मोदी लाट ओसरल्याचा बाऊ करण्यात विरोधी कॉंग्रेस महाआघाडीचे नेते वरवर यशस्वी ठरत होते. मात्र, देशासह मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा मांडत, मोदींची प्रतिमा आणि खासदारकीसह मंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या भरीव कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवत डॉ. भामरे यांनी संयमाने प्रचार केला. तो मतदारांच्या पचनी पडला. त्यांच्यावर दुसऱ्यांदा विश्‍वास व्यक्त करत मोठ्या मताधिक्‍याने खासदारकी बहाल केल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

डॉ. भामरे यांची वाटचाल 
मंत्री डॉ. भामरे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1953 ला झाला. मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी "एमबीबीएस' आणि "एमएस'ची पदवी घेतली. पक्षविरहित व्यक्तिमत्त्व, नम्र, चांगले डॉक्‍टर, चांगला माणूस, उच्च विद्याविभूषित, अभ्यासू, निष्णात कॅन्सरतज्ज्ञ, अशा डॉ. भामरे यांच्या जमेच्या बाजू आहेत. शिवसेनेकडून 2004 मध्ये धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढताना ते पाच हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. मात्र, ऐन 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेतून ते भाजपमध्ये दाखल झाले. जातीय समीकरणांचा एक लाभ गृहीत धरता त्यांच्या या निवडणुकीतील विजयात मोदी लाटेचा सर्वाधिक वाटा राहिला. ते एक लाख 30 हजार मताधिक्‍याने निवडून आले. प्रथमच खासदार आणि प्रथमच मंत्रिपदाचे भाग्य डॉ. भामरे यांना लाभले. त्यांनी सात जुलै 2016 ला मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांचे वडील (कै.) रामराव पाटील यांची कॉंग्रेसमध्ये दमदार वाटचाल राहिली. ते धुळे- नंदुरबार जिल्हा बॅंकेचे पंधरा वर्षे अध्यक्ष होते. डॉ. भामरेंच्या आई (कै.) गोजरताई भामरे या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. भक्कम राजकीय वारसा असताना स्वतः डॉक्‍टर राजकारणाच्या पटलावर तसे फारसे सक्रिय नव्हते, पण आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांनी अफाट असा अदृश्‍य जनसंपर्क निर्माण करून ठेवला होता. संरक्षण खाते मिळणारे डॉ. भामरे महाराष्ट्रातील चौथे नेते ठरले आहेत. आताच्या निवडणुकीत विजयानंतर त्यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे. त्यांच्या विजयाकडील वाटचालीमुळे आतषबाजी, जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com