दृष्टी गेली तरी भारतीय क्रिकेट संघातून षटकार...राहुलची ही कामगिरी बघा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

राहुल हा खानदेश विभागीय ब्लाइंड क्रिकेट संघात खेळत होता. त्याचा चांगला खेळ असल्याने महाराष्ट्राच्या संघात त्याचा समावेश झाला. त्याच्या उत्कृष्ट खेळाची दखल मुंबईच्या महाराष्ट्र ब्लाइंड क्रिकेट संघाने घेतली आणि ऑक्टोबरमध्ये राहुलची निवड करण्यात आली.

पाचोरा : दिघी येथील रहिवासी तथा चाळीसगावच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अंधशाळेचा माजी विद्यार्थी तथा दिव्यांग खेळाडू राहुल संजय महाले (कोळी) याची क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड (अंध) इंडियाच्या संघात निवड झाली होती. भारताच्या संघात निवड होणारा राहुल हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू ठरला आहे. या निवडीनंतर कानपूर (उत्तर प्रदेश) येथे भारत- नेपाळ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारताने विजय प्राप्त केला. 

सुरवातीला राहुल हा खानदेश विभागीय ब्लाइंड क्रिकेट संघात खेळत होता. त्याचा चांगला खेळ असल्याने महाराष्ट्राच्या संघात त्याचा समावेश झाला. त्याच्या उत्कृष्ट खेळाची दखल मुंबईच्या महाराष्ट्र ब्लाइंड क्रिकेट संघाने घेतली आणि ऑक्टोबरमध्ये राहुलची निवड करण्यात आली. त्यानंतर राज्यपातळीवर खेळविण्यात आलेल्या अनेक सामन्यांमध्ये राहुलने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इंडिया (बंगळूर) यांच्यातर्फे भारतीय संघात त्याची खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. 

Image may contain: 10 people, people standing and outdoor

नक्‍की पहा > लग्नाला झाले अवघे तीनच महिने अन्‌ तो तिला म्हणाला...

"बी तीन' प्रकारात पात्र

उत्कृष्ट खेळासोबतच अंधांच्या संघात पात्रता म्हणून तीन पद्धती असतात. ज्यात ‘बी- एक’ म्हणजे, ज्या खेळाडूला अजिबात दिसत नाही. ‘बी-दोन’ ज्यात पाच ते सहा मीटरपर्यंतच खेळाडूला दिसते. ‘बी- तीन’ म्हणजे सहा मीटरच्या पुढील खेळाडू पाहू शकतो. यातील ‘बी- तीन’ प्रकारात राहुल पात्र ठरला. विशेष म्हणजे, भारतीय संघात तो सहभागी झाल्यानंतर भारत विरुद्ध नेपाळमध्ये झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने चांगला खेळ करून संधीचे सोने केले व अंतिम सामन्यात भारताला विजय प्राप्त करून दिला. 

क्‍लिक करा > "पिंक सिटी' नव्हे आमचे "पिंक व्हिलेज' पहा... 

नशिबाने केला घात 
राहुल हा जन्मताच दृष्टिहीन नसून, वयाच्या पाचव्या वर्षी त्याची दृष्टी अचानकपणे गेली. त्यामुळे त्याने चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेच्या अंधशाळेत प्रवेश घेतला व बारावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत पूर्ण केले. त्यानंतर पदवीसाठी जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात प्रवेश घेतला. राहुलला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्याला व्यवस्थित दिसत नसतानाही तो गल्लीत, शाळेत हातात बॅट व चेंडू घेऊन खेळायचा. त्याचा हा छंद पाहून त्याचे अंधशाळेतील शिक्षक संजय घोडेराव यांनी त्याला प्रोत्साहन दिले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुलने क्रिकेटमध्ये यश संपादन केले. 

दोघे सख्खे भाऊ अंध 
राहुलची घरची परिस्थिती जेमतेम असून, वडिलांकडे तीन एकर जमीन आहे. राहुलला आणखीन दोन भाऊ असून, तो सर्वांत लहान आहे. मधला भाऊ विनोद हादेखील अंध आहे. विनोदला जन्मतः पाहता येत होते. मात्र, विनोदची वयाचा सहाव्या वर्षी अचानक दृष्टी गेली व त्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी राहुलचीही दृष्टी गेली. आई-वडिलांसह परिवारातील सर्वांच्याच जीवनात जणू अंधार निर्माण झाला. गावात या दोन्ही भावंडांबद्दल आजही ग्रामस्थ हळहळ व्यक्त करतात. वडिलांनी दोन्ही मुलांवर उपचारासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे दोन्ही भावंडाना चाळीसगावच्या राष्ट्रीय अंधशाळेत त्यांनी दाखल केले. आपल्या दोन्ही मुलांना दिसले पाहिजे, यासाठी वडिलांचे प्रयत्न सुरूच होते. काही वर्षांनंतर राहुलच्या बाबतीत यश आले. राहुलला काही प्रमाणात दिसू लागले. राहुलप्रमाणेच विनोद हादेखील क्रिकेटचा खेळाडू आहे. राहुलप्रमाणेच विनोदचेदेखील ब्लाइंड क्रिकेट टीममध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blaind cricket india team rahul mahale selection jalgaon