पाणी फाउंडेशनसाठी दिव्यांग दाम्पत्य सरसावले 

kavare
kavare

मेहुणबारे (जळगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील दिव्यांग पती- पत्नीने अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या कार्याने प्रेरित होऊन आपल्या घराच्या अंगणात सिमेंट काँक्रीटचा रस्ता केवळ छिनी हातोड्याचा वापर करत तोडून शोषखड्डा तयार केला. पाणी फाउंडेशनच्या कामला हातभार लावताना आपणही कोणापेक्षा कमी नाहीत हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. अभिनेता अमीर खानने या कार्याची दखल घ्यावी, असे आदर्श काम या दिव्यांग दाम्पत्याने केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

गिरणा काठावरील वरखेडे (ता. चाळीसगाव) गावात जलचळवळ पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झाली आहे. उशाला गिरणा नदी असली तरी भविष्यात घशाला कोरड पडणार नाही, यासाठी उपाययोजना म्हणून गावातील कैलास कावरे व त्यांच्या पत्नी माधवी कावरे यांनी मनाशी खूणगाठ बांधली. त्यांनी पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाला जाऊन कार्याची माहिती जाणून घेतली. त्यानुसार, शोषखड्डा बनविण्याचा निर्णय घेतला. 

व्यंगत्व विसरून लागले कामाला 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जमिनीत पाणी मुरावे यासाठी कैलास व माधवी या दाम्पत्याने आपले व्यंगत्व विसरून अंगणात शोषखड्डा खोदण्यास सुरवात केली. बुधवारी (२० मार्च) सकाळी अकराला होळीच्या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी या कामाचा शुभारंभ केला. कैलास यांनी छनी, हातोडा व छोटी पहार हे साहित्य जमवले. विशेष म्हणजे त्यांच्या घराजवळचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता असताना त्यांनी त्यावर बसून तो तोडायला सुरवात केली. अखेर त्यांचा चार बाय चार आकाराचा शोषखड्डा तयार केला. या कामात टिकाव व फावड्याचा त्यांनी वापरच केला नाही. खड्ड्यातील माती हाताने घमेल्यात भरून त्याच्या दिव्यांग असलेल्या पत्नीने ती बाहेर फेकण्यासाठी मदत केली. एखाद्या सुदृढ माणसालाही लाजवेल असे काम या दिव्यांग पती-पत्नीने करून दाखवले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गावातील अनेकांनी शोषखड्डा तयार करण्यासाठी आता पुढाकार घेतला असून काहींनी सुरवात देखील केली आहे. 

सिमेंटची टाकी भेट 
अपंग दाम्पत्य शोषखड्डा तयार करतानाचा व्हिडिओ आज सकाळी ‘ई- सकाळ’वर झळकताच मेहुणबारे पोलिस ठाण्याचे हवालदार गोरख चकोर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या दाम्पत्याला एक हजार रुपयाची सिंमेट टाकी व वरखेडेपर्यंत टाकी नेण्यासाठी भाड्याचे तीनशे रुपये असे तेराशे रुपये रोख भेट दिले. श्री. चकोर यांनी केलेल्या या आर्थिक मदतीमुळे या दाम्पत्याला मोठा आधार मिळाला आहे. पाणी फाउंडेशनचे काम करणारे जलयोद्धे निखिल कच्छवा,अर्चना पवार, चाळीसगावच्या नगरसेविका सविता राजपूत, कोमलसिंह महाले, चौपसिंग पाटील, पोलीस पाटील राधेश्याम जगताप, भगवान पगारे, साधना कच्छवा यांच्यासह ग्रामस्थांनी श्री. चकोर यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. 

शिक्षिका नगरसेविकेचे ज्ञानदानासोबत श्रमदान 
कावरे दाम्पत्याला या कामासाठी चाळीसगावच्या नगरसेविका तथा गावातील उदेसिंग पवार आश्रमशाळेत शिक्षिका असलेल्या सविता जाधव यांनी प्रेरणा दिली. वरखेडे गाव, तांडा, वस्त्या पाणीदार करण्याचा जणू त्यांनी विडा उचलला आहे. पंधरा दिवसांपासून वरखेडे येथे त्या मुक्काम करून महिलांसह ग्रामस्थांच्या बैठका घेत आहेत. यात ग्रामस्थांना 
पाण्याचे महत्त्व पटवून त्यांच्यात जनजागृती करीत आहेत. या कामासाठी ग्रामस्थांनी एकत्र यावे, असे आवाहन सविता जाधव यांनी केले आहे. ज्ञानदानाबरोबर त्यांचे श्रमदानाचे कार्य ग्रामस्थांना प्रेरणादायी ठरले आहे. 

गावात वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू असले तरी या प्रकल्पाचे पाणी आपले नाही. गावात प्रत्येकाने शोषखड्डा तयार केल्यास आजूबाजूच्या विहिरींची पातळी वाढण्यास निश्चितच मदत होईल. मला पाणी फाउंडेशनच्या बैठकीत सांगितलेले मुद्दे पटले. त्यामुळे आम्ही अपंग आहेत हे विसरून कामाला लागलो आणि हा शोषखड्डा तयार केला. 
- कैलास कावरे, वरखेडे (ता. चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com