भाजप नगरसेवकांच्या गाड्यांची मध्यरात्री तोडफोड

राजेंद्र बच्छाव
गुरुवार, 5 एप्रिल 2018

इंदिरानगर (नाशिक) - प्रभाग 30चे भाजप नगरसेवक  सतीश सोनवणे आणि दीपाली कुलकर्णी यांच्या वाहनांची मध्यरात्री तोडफोड झाली. पोलिस सर्व बाजूने या घटनेची सखोल चौकशी करत असून, मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे कृत्य करणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

इंदिरानगर (नाशिक) - प्रभाग 30चे भाजप नगरसेवक  सतीश सोनवणे आणि दीपाली कुलकर्णी यांच्या वाहनांची मध्यरात्री तोडफोड झाली. पोलिस सर्व बाजूने या घटनेची सखोल चौकशी करत असून, मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे कृत्य करणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास नगरसेविका कुलकर्णी यांच्या अजय मित्र मंडळाच्या मैदानाजवळ असलेल्या साईश्रद्धा अपार्टमेंटच्या बाहेर उभ्या केलेल्या गाडीच्या काचेवर लाकडी दंडुक्यांचा प्रहार झाल्याने त्यांचे पती सचिन कुलकर्णी यांना जाग आली. त्यांनी खाली पाहिले असता पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा आणि सीडी डॉन दुचाकीद्वारे आलेले चौघे त्यांना दिसले. कुलकर्णी खाली येई पर्यंत गाडी फोडणाऱ्यांनी त्यांनी पळ काढला. त्यानंतर अर्ध्यातासातच राजीवनगर येथील कोहिनूर कॉलनी मध्ये राहणारे नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या निवासस्थाना बाहेर लावलेल्या त्यांच्या गाडीच्या  काचा फोडण्यात आल्या. 

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज नुसार दोन्ही ठिकाणी तोडफोड करणारे सारखेच असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहळदे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गंगाधर देवडे आदींसह अधिकाऱयांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे. या भागातील सर्वच नगरसेवक भाजपचे आहेत तरीदेखील काही राजकीय हेवेदावे अथवा इतर पक्षीय राजकारणा सह सर्व अंगाने पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. 

पोलिसांनी दोन्ही ठिकाणी आणलेल्या श्वानाने परिसरात पुढे पर्यंत पोलिसांना मार्ग दाखवला. दरम्यान,  नगरसेवकांनी या घटनेबाबत काहीही अंदाज व्यक्त करता येत नाही असे सांगितले असून, पोलिसांनी सर्वांगाने चौकशी करून परिसरात नाहक दशहत माजवणाऱ्या या गुंड प्रवृत्तींना ताब्यात घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, लवकरच या गुन्हेगारांना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे .

Web Title: BMC corporators' vehicles crime