‘जीएसटी’वरील पुस्तक सर्वांसाठी उपयुक्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

जळगाव - ‘सकाळ’ पब्लिकेशनच्या ‘असा आहे जीएसटी कायदा : स्वरूप व पूर्वतयारी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (ता. २४) केमिस्ट संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यशाळेत पुस्तकाचे लेखक ॲड. गोविंद पटवर्धन यांनी या पुस्तकातून जीएसटी कायदा समजून घेणे सोपे होईल, ते सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. 

महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची सभा आज असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केमिस्ट भवनात झाली. यावेळी संघटनेचे सचिव अनिल नावंदर, कोशाध्यक्ष जगन्नाथ जागृष्टे, विनय श्रॉफ, विजय पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी समन्वयक वीरेंद्र शहा यांनी प्रास्ताविकात या पुस्तकाबद्दल माहिती दिली. येत्या एक जुलैपासून नवा जीएसटी कायदा लागू होत असून, त्याबाबत मराठीतून कोणताही मजकूर उपलब्ध नव्हता. ॲड. पटवर्धन यांच्या या पुस्तकातून ‘जीएसटी’ कायदा समजून घेणे सोपे होईल. जीएसटीसंदर्भात मराठीतील हे पहिलेच पुस्तक आहे, असे ते म्हणाले. ॲड. पटवर्धन यांच्या माध्यमातून मेडिकल व ड्रगिस्ट बांधवांसाठी माहितीपूर्ण असलेले ‘असा आहे जीएसटी कायदा’ या पुस्तकाचे प्रकाशन खास सकाळ माध्यम समूहाद्वारे करण्यात आले आहे. केमिस्ट संघटनेने पुस्तकाच्या दोन हजार प्रती खरेदी केल्या असून, त्या केमिस्ट बांधवांना वितरित केल्या जाणार आहेत, असे सांगितले. 

कार्यशाळेत मार्गदर्शन
दरम्यान, पुस्तक प्रकाशनानंतर ॲड. पटवर्धन यांनी जीएसटीसंदर्भात केमिस्ट बांधवांची कार्यशाळा घेतली. जीएसटीतील विविध तरतुदी, प्रत्येक नियमाचा अर्थ, त्यासंबंधी घ्यावयाची काळजी, त्याचे परिणाम यासंबंधी अभ्यासपूर्ण विश्‍लेषण केले. कार्यशाळेच्या समारोपाला केमिस्ट बांधवांनी उपस्थित केलेल्या शंकांचेही त्यांनी निरसन केले. पुस्तक निर्मितीला वीरेंद्र शहा, वैजनाथ जागृष्टे यांचे विशेष सहकार्य लाभले.

‘सकाळचे’ आभार
पुस्तक प्रकाशनानंतर केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री. शिंदे यांनी सकाळ माध्यम समूहाने ‘जीएसटी’संदर्भात काढलेल्या पुस्तकाचा फायदा केमिस्ट बांधवांना मिळेल, याबद्दल ‘सकाळ’चे आभार व्यक्त करत हे पुस्तक केमिस्ट बांधवांना निश्‍चितच उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

Web Title: The book on 'GST' is suitable for all