जन्मदात्या आईलाच ‘तिसरी’ नकोशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जून 2019

जन्मदात्या आईलाच आपली मुलगी ‘नकोशी’ झाल्याने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव शिवारात घडला. तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांची चिमुकली पियू हिची तिच्या आईनेच डोक्‍यात जोरात प्रहार करत गळा आवळून हत्या केली.

दहा दिवसांच्या चिमुकलीची हत्या
नाशिक - जन्मदात्या आईलाच आपली मुलगी ‘नकोशी’ झाल्याने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव शिवारात घडला. तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांची चिमुकली पियू हिची तिच्या आईनेच डोक्‍यात जोरात प्रहार करत गळा आवळून हत्या केली. 

याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तिला अटक करण्यात आली आहे. 

अनुजा बाळासाहेब काळे यांना दहा दिवसांपूर्वी मुलगी झाली. मात्र, तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याने त्या नाराज होत्या. ३१ मे रोजी बाळासाहेब काळे हे बाहेरगावी गेले असताना, अनुजा यांनी या तिसऱ्या अपत्याच्या डोक्‍यात जोरात प्रहार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली.

शवविच्छेदनाच्या अहवालावरून पियू हिच्या डोक्‍यास मार बसला असून, तिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. त्यावर आडगाव पोलिसांनी अनुजा काळे यांच्याकडे कसून चौकशी केली असता, अनुजाने गुन्ह्याची कबुली देत, तिसरी मुलगीच झाल्याने आपण नैराश्‍यातून हा प्रकार केल्याचे सांगितले. दरम्यान, सहा वर्षांच्या आराध्याला डायबेटिसचा त्रास आहे. दुसऱ्या मुलीचा बारा दिवसांपूर्वीच फिट येऊन मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Born baby Murder by Mother Crime