देशभरातील उत्पादन ‘बॉश’ बंद ठेवणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

लघुउद्योगांना झळ
आधुनिक वाहन तयार करण्यासाठी चेसीस, इंजिन, बॉडीसह विविध प्रकारचे साधारण साडेबाराशे छोटे-मोठे पार्ट लागतात. हे सर्व पार्ट वाहन कंपन्या ऑउटसोर्सिंग करतात. त्यामुळे मंदीचा सर्वाधिक फटका अशा उद्योगांत काम करणारे अधिकारी, कामगार, कर्मचारी, कंत्राटी कामगार, ठेकेदार, हंगामी कामगार, ट्रान्स्पोर्ट, माथाडी आदींना बसत आहे. परिणामी ठेकेदारी, कंत्राटी कामगारांबरोबरच आता कायम कामगारांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

सातपूर- वाहन उद्योगातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर बॉश ग्रुपने ऑटोमोबाईल क्षेत्रातील कपोनंट तयार करणारे नाशिक, पुण्यासह देशभरातील सर्वच प्रकल्पांत १६ ऑगस्टपासून पुढे आठ ते दहा दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकच्या प्रकल्पात रोज होणारे ७० हजार इंजेक्‍टर व नोझलचे उत्पादन बंद असेल. येत्या काळात मंदीच्या झळा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जगभरातील वाहन उद्योगाला सध्या मंदीचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणाचे जागतिक मानांकन राखण्यासाठी डिझेल इंजिनावर आणलेली बंदी आणि इलेक्‍ट्रिक वाहनाचे धोरण यामुळे जगभर वाहन खरेदीवर परिणाम जाणवत आहे. सध्या ३० टक्के वाहनखरेदी कमी झाली आहे.

त्यामुळे कंपन्यांनी जोपर्यंत स्टॉकमधील उत्पादन खपत नाही, तोपर्यंत नवीन टेक्‍नॉलॉजीचे बीएसयू- ६ इंजिन असलेल्या गाड्या तयार करण्यासाठी त्या-त्या प्रकल्पांत तंत्रज्ञान अपग्रेड करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, त्यामुळे या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या हजारो सुटे भाग बनविणाऱ्या छोट्या-मोठ्या कंपन्या आणि लघुउद्योगांवर मोठा परिणाम बघावयास मिळत आहे. त्यातच बॉश ग्रुपने १६ व १७ आणि २६ ते ३१ ऑगस्टदरम्यान नाशिक, पुण्यासह देशभरातील वाहन उद्योगाशी संबंधित पार्टचे उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

सहा महिन्यांपासून बॉश कंपनीत कामगारकपात, इन-आउट सुरू आहे. गेल्या महिन्यात महिंद्र, बॉश, सीएटसह अन्य मोठ्या कंपन्यांनी उत्पादन बंद ठेवले होते. त्यामुळे या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या व्हेंडर कंपन्या व कामगारांना रोजगार गमवावा लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bosch Company Production Close