
Dhule Crime News : लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
शिरपूर : लाच मागितली, ती स्वीकारण्याची तयारीदेखील झाली पण अचानक संशय आल्याने तलाठ्याने चारचाकी बाहेर काढून धुळ्याकडे वळवली. संशयित पळतोय हे लक्षात आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करून महामार्गावर त्याला ताब्यात घेतले.
चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने खंबाळे (ता.शिरपूर) येथील तलाठी सुऱ्या पायल्या कोकणी (वय ५३) याला मंगळवारी (ता.३१) दुपारी लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदाराचे वडील २०१७ मध्ये मृत झाल्याने त्यांच्या शेतजमिनीला वारस लावण्याची कार्यवाही प्रलंबित होती. (Bribe Talathi Arrested by ACB Dhule News )
त्यामुळे संबंधित सातबाऱ्यावर वारस लावण्यासाठी त्यांनी तलाठी कोकणी याची भेट घेतली असता त्याने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज व सोबत सात हजार रुपये आणावेत अशी मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली.
विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची खात्री केल्यानंतर मंगळवारी सापळा रचला. तडजोडीअंती ठरलेली सहा हजार रुपयांची रक्कम घेण्यासाठी कोकणी याने तक्रारदाराला बोलावले. मात्र त्याला सापळ्याचा संशय आल्याने पैसे न स्वीकारताच तो कार घेऊन शिरपूरच्या दिशेने निघून गेला. पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
त्याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत विभागाचे धुळे येथील पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, हवालदार राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.