हरित ग्रामसाठी नववधू सरसावली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

चाळीसगाव - सर्वांगीण विकास साधण्याची परंपरा लाभलेल्या चितेगाव (ता. चाळीसगाव) येथे नववधूने लग्नाचे औचित्य साधून आपले गाव ‘हरित ग्राम’ व्हावे, या उद्देशाने स्वतः वृक्षारोपण करून आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. यानिमित्ताने गावाने वृक्षसंवर्धनाचा निर्धार करून लावण्यात आलेली सर्व रोपे जगविण्यासाठी केलेली जनजागृती कौतुकास्पद ठरली आहे. 

चितेगाव येथील बाळासाहेब देसले यांची पुतणी तसेच रोहन देसले यांची बहीण पल्लवी हिचा नुकताच विवाह पार पडला. याचे औचित्य साधून सरपंच अमोल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पल्लवी देसले हिच्या हस्ते घराजवळ वृक्षारोपण केले. दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे बिघडणाऱ्या पर्यावरण संतुलनावर मात करण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे असल्याचे सरपंच अमोल भोसले यांनी सांगितले. त्यामुळे ज्या-ज्या मुली नववधू होतील, त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या नववधूच्या हातून रोप गावात लावले जाईल, ती सासरी गेल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी लावण्यात आलेल्या रोपाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आहे. त्यामुळे हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरला आहे. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे संपूर्ण गावानेच वृक्षसंवर्धनाचा निर्धार केला आहे. यापूर्वी चितेगावला ‘स्मार्ट ग्राम’, ‘आयएसओ’, संत गाडगेबाबा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संघटित कार्यप्रणालीचे हे फळ असल्याचे सरपंच अमोल भोसले यांनी सांगितले.

Web Title: Bridegroom for Green Village