बहिणीची लग्नपत्रिका वाटायला गेलेला भाऊ अपघातात ठार

दीपक  कच्छवा 
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटून खाजोळा (ता.पाचोरा) येथे घरी निघालेल्या भावाच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. त्यात भावाचा जागीच मृत्यू झाला तर काका गंभीर जखमी झाले आहेत.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटून खाजोळा (ता.पाचोरा) येथे घरी निघालेल्या भावाच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. त्यात भावाचा जागीच मृत्यू झाला तर काका गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चाळीसगाव-धुळे महामार्गावर चिंचगव्हाण फाट्यापासून एक किलोमीटरवर काल (शनिवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

खाजोळा येथील मुकंदा दगा पाटील यांची मुलगी करूणाचा विवाह 26 फेब्रुवारीला होणार आहे. या विवाह सोहळ्याची घरात जोरदार तयारी सुरू आहे. मुंकदा पाटील यांच्या भावाचा मुलगा प्रविण हेमराज पाटील वय (35) त्यांचा भाऊ गुलाब दगा पाटील, (65) दुचाकीने (क्रमांक MH.19.CH.4276) लग्नपत्रिका वाटण्यासाठी घरातून निघाले होते.  शुक्रवारी (ता. 8) दोघांनी दहीवद (ता.चाळीसगाव) येथे मुक्काम केला. शनिवारी सकाळी पत्रिका वाटण्यासाठी ते निघाले. सायंकाळी धुळ्याकडून चाळीसगावकडे जाताना चिंचगव्हाण फाट्यापासून एक किलोमीटरवर चाळीसगावकडून धुळ्याकडे भरधाव कारने (क्रमांक MH.18.W.2128) समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली.

खाजोळा येथील प्रविण पाटील हा तरूण जागीच ठार झाला तर त्याच्या काकाचा एक पाय मोडून गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नजिम शेख, पोलिस हवालदार पांडुरंग पाटील, गफ्फूर शेख यांनी पंचनामा केला. अपघात घडताच कारमधून दोघेही फरार झाले. प्रविण पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तर गुलाब पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, कारमधील दोघांनी मद्यपान केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

खाजोळा गावावर शोककळा
 
प्रविण पाटीलच्या अपघाताची बातमी खाजोळा गावात कळताच त्यांच्या घरी एकच आक्रोश सुरू झाला. प्रविण पाटील हा नवरी मुलीचा चुलत भाऊ होता. प्रविणच्या घराची परिस्थिती एकदमच हलाखीची आहे. त्याला एक दहा वर्षांचा भूषण नावाचा मुलगा असून तो हाताने अपंग आहे. यामुळे या घरावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

आमदारांनी केला 108 ला फोन

चाळीसगाव-धुळे महामार्गावर अपघात घडला, त्यावेळी त्या ठिकाणाहून आमदार उन्मेष पाटील जात होते. त्यांना घटना समजताच त्यांनी तातडीने तेथे धाव घेऊन 108 वर फोन केला व तो फोन चालक रवी सुर्यवंशी यांनी घेतला. घटनेची माहिती घेऊन घटनास्थळी पडलेल्याना रूग्णालयात पोहचविले आमदारांच्या या जागरूकतेमुळे एकाला जीवदान मिळाले. आमदारांनी अपघातस्थळी मदत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Brother dead in the accident while Distributes Sisiters Wedding Card