"बीएसएनएल'च्या 5 उपविभागीय कार्यालयांची वीज खंडित 

"बीएसएनएल'च्या 5 उपविभागीय कार्यालयांची वीज खंडित 

जळगाव ः भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) कार्यालयांकडे "महावितरण'कडून देण्यात येणाऱ्या सेवेची गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी होती. यासंदर्भात वारंवार नोटीस देऊनही "बीएसएनएल' थकीत रकमेचा भरणा करत नव्हते. अखेर आज "महावितरण'च्या पथकाकडून "बीएसएनएल'च्या पाच विभागीय कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे "बीएसएनएल'कडून तत्काळ थकीत बिलाच्या रकमेचा भरणा करण्यात आला. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 
गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम "महावितरण'कडून हाती घेण्यात आली आहे. आज "महावितरण'च्या जळगावसह इतर चार विभागीय कार्यालयांकडे सुमारे 29 लाखांची थकबाकी होती. वारंवार नोटीस देऊनही "बीएसएनएल' ही थकबाकीची रक्कम भरत नसल्याने या पाचही कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश "महावितरण'च्या परिमंडळ कार्यालयाने दिले होते. त्याबाबत या कार्यालयांना विजेची रक्कम भरण्यासाठी मुदतही दिली होती. मात्र तरीही त्यांच्याकडून वीजबिलाची रक्कम भरली जात नसल्याने अखेर आज "महावितरण'च्या पथकांकडून जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा या कार्यालयांचा पुरवठा खंडित करण्यात आला. 

महिलादिनाचा कार्यक्रम अंधारातच! 
जळगावच्या "बीएसएनएल' कार्यालयात आज महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुपारी तीनच्या सुमारास "महावितरण'च्या पथकाकडून जळगाव कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे महिलांना हा कार्यक्रम अंधारातच पार पाडावा लागला. "महावितरण'ने वीजपुरवठा खंडित केल्याने महिलांसह कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. 

थकबाकी वसुली झाल्यानंतर पुरवठा सुरळीत 
"महावितरण'ची सुमारे 29 लाख रुपये थकबाकी असल्याने पाच विभागीय कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान "बीएसएनएल'कडून सायंकाळी संपूर्ण थकबाकी रकमेचा भरणा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सर्व कार्यालयांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

अशी होती थकबाकी 
जळगाव कार्यालय-12 लाख 40 हजार, भुसावळ- 6 लाख 92 हजार, चाळीसगाव- 3 लाख 34 हजार, चोपडा- 2 लाख 22 हजार अशी एकूण 29 लाख पाच हजार रुपये थकबाकीची रक्कम होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com