जळगाव जिल्ह्यात १५ मेनंतर मिळणार बीटी बियाणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

जळगाव - जिल्ह्यात बोंडअळी आल्याने खरीप हंगामासाठी यंदा २१ मेनंतर बीटी बियाणे उपलब्ध होणार होते. आता मात्र त्यात सहा दिवसांची घट होऊन ही बियाणे १५ मेनंतर उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी १६ भरारी पथकांची नियुक्ती झाली आहे. जिल्ह्यात यंदा आठ लाख ३४ हजार ४५० हेक्‍टर क्षेत्र इतकी खरीप पेरणी होणार आहे.

जळगाव - जिल्ह्यात बोंडअळी आल्याने खरीप हंगामासाठी यंदा २१ मेनंतर बीटी बियाणे उपलब्ध होणार होते. आता मात्र त्यात सहा दिवसांची घट होऊन ही बियाणे १५ मेनंतर उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी १६ भरारी पथकांची नियुक्ती झाली आहे. जिल्ह्यात यंदा आठ लाख ३४ हजार ४५० हेक्‍टर क्षेत्र इतकी खरीप पेरणी होणार आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात बागायती कपाशीची लागवड होते. गेल्या वर्षी आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे यंदा बियाणे २१ मेनंतर विक्रीस येणार होते. मात्र, कृषी विभागाने केंद्र शासनाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मे महिन्यात बागायती कपाशी लागवडीचा कल पाहता लवकर बियाणे उपलब्ध होण्याची मागणी केली होती. त्यानुसार सहा दिवस अगोदर म्हणजे १५ मेनंतर बीटी बियाणे विक्रीस उपलब्ध होईल, असे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

तालुकानिहाय भरारी पथके
बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी १५ तालुक्‍यांत १५ व जिल्हास्तरावर एक अशा १६ भरारी पथकांची नियुक्ती कृषी विभागाने केली आहे. 
तालुकास्तरावरील पथकात तालुका कृषी अधिकारी अध्यक्ष असतील. पंचायत समितीचे कृषी अधिकारी, वजन मापे निरीक्षक, मंडल कृषी अधिकारी, कृषी अधिकारी यांचा त्यात समावेश असेल. जिल्हास्तरावरील पथकात कृषी विकास अधिकारी अध्यक्ष असतील. मोहीम अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, वजनमापे निरीक्षक यांचा त्यात समावेश असेल.

शेतकऱ्यांना आवाहन
जर कोणी बियाण्यांची विनापरवाना, विनाबिलाने विक्री करीत असेल, तर ते बियाणे घेऊ नका. त्याबाबत लागलीच कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर (१८००२३३४०००) त्वरित संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांच्या नावानेच बिल घ्यावे. बिल घेतल्याशिवाय बियाणे घेऊ नका. ‘बीटी’ वाण कीडविरोधी असले, तरी गतवर्षी त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे यंदा ‘बीटी’मध्येच नॉन बीटी एकत्र करून देण्यात येईल. यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.

जिल्ह्यात बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांनी विनापावती बियाणे घेऊ नये. त्यात त्यांची फसगत होण्याची शक्‍यता असते. कोणी विना ावतीचे बियाणे विकत असेल, तर लागलीच कृषी विभागाच्या टोल क्रमांकावर तक्रार करावी.
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव

स्वदेशीची २० हजार पाकिटे
कपाशीच्या स्वदेशी संकरित वाणाची जिल्ह्यात १५ ते २० हजार पाकिटे विक्रीस येणार आहेत. हे नॉन बीटी वाण आहे. यावर दोन- तीन वेळा कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. मात्र, हा कापूस वेचणीस सोपा असतो. उत्पादनही चांगले येते. 

Web Title: BT seed agriculture