ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या जागेवर बिल्डरचा शामियाना!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

महापालिका प्रशासन अनभिज्ञ; बांधकाम व्यावसायिक महापौरांचे स्नेही?

जळगाव - ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या जागेची भाजी बाजार बसविण्यासाठी महापालिकेने सफाई केली; परंतु गेल्या तीन दिवसांपासून या जागेवर बिल्डरच्या कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी शामियाना उभारून वापर केला जात आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याची बाब समोर येत असून संबंधित बांधकाम व्यावसायिक महापौरांचे निकटवर्तीय असल्याचीही चर्चा आहे.

महापालिका प्रशासन अनभिज्ञ; बांधकाम व्यावसायिक महापौरांचे स्नेही?

जळगाव - ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या जागेची भाजी बाजार बसविण्यासाठी महापालिकेने सफाई केली; परंतु गेल्या तीन दिवसांपासून या जागेवर बिल्डरच्या कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी शामियाना उभारून वापर केला जात आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याची बाब समोर येत असून संबंधित बांधकाम व्यावसायिक महापौरांचे निकटवर्तीय असल्याचीही चर्चा आहे.

गणेश कॉलनी रस्त्यावरील ख्वाजामियाँ दर्ग्याजवळील जागेवर महापालिकेने महासभेत ठराव करून तेथे शहरातील भाजी विक्रेत्यांना बसवून बाजार भरविण्याचा ठराव केला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून तडकाफडकी या जागेचे सपाटीकरण, झाडेझुडपे तसेच जागा स्वच्छ करण्यात आली होती. या जागेची आयुक्त, महापौर, उपमहापौरांनीदेखील पाहणी केली होती.

परवानगीविनाच वापर
या जागेवर गेल्या तीन दिवसांपासून कार्यक्रमासाठी शामियाना उभारला गेला आहे; परंतु याबाबत कोणतीही परवानगी घेतली नसल्याची बाब समोर येत आहे. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना या जागेवर काय चालू आहे? हेदेखील माहीत नसल्याचे धक्कादायक समोर येत आहे.

नोटीस बजावण्याच्या सूचना
आयुक्त जीवन सोनवणे यांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी कार्यक्रमासाठी परवानगी घेतली का? याची माहिती जाणून घेतली. परवानगी घेतली नसल्याने किरकोळ वसुलीचे नरेंद्र चौधरी यांना तत्काळ पाठवून त्यांना नोटीस तसेच दंड आकारण्याच्या सूचना केल्या.

अग्निशामक बंब दिमतीला
ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या जागेवर कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वयंपाकगृहाला महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिसून आले. कार्यक्रमाला जागा वापरण्याबाबत महापालिकेची परवानगी घेतलेली नसताना, दुसरीकडे या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या बंबानेच पाणीपुरवठा करावा, याबद्दलही आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

मैदानाची स्वच्छता कार्यक्रमासाठी?
महापालिका प्रशासनाचा भाजी बाजार भरविण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर तेथे स्वच्छता, सपाटीकरण केले होते; परंतु या जागेवर शहरातील ‘आदित्य बिल्डर्स’च्या कार्यालय उद्‌घाटन कार्यक्रमाचा मंडप उभारला गेला असल्याची माहिती मिळाली. हे ‘आदित्य बिल्डर्स’चे संचालक महापौरांचे जवळचे मित्र असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे भाजी बाजाराच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यक्रमास म्हणून या जागेचे सपाटीकरण करण्यात आले का, असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
 

नगररचना विभागाला अर्ज
ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या जागेवर कार्यक्रम करण्यासाठी आदित्य बिल्डर्सचे संचालकांनी परवानगी घेतली  होती का, याबाबत आयुक्तांनी नगररचना विभागाला विचारणा केली असता संबंधित बांधकाम व्यावसायिक प्रतिष्ठानकडून परवानगीबाबत अर्ज आल्याचे नगररचना विभागाकडून सांगण्यात आले, तसे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र, तत्पूर्वी आयुक्तांनी यासंदर्भात विचारणा केली असता प्रशासन या बाबीसंदर्भात अनभिज्ञ होते.

Web Title: builder office on khawajamiyan place