रानडुकराच्या हल्ल्यात मोताळ्यात शेतमजूर गंभीर जखमी

शाहीद कुरेशी
गुरुवार, 22 जून 2017

मोताळा (बुलडाणा) : रानडुकराच्या हल्ल्यात शेतात काम करीत असलेला मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शेलगाव बाजार शिवारात गुरुवारी (ता.२२) सकाळी ११:३० वाजेदरम्यान घडली. गंभीर जखमीस मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मोताळा (बुलडाणा) : रानडुकराच्या हल्ल्यात शेतात काम करीत असलेला मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शेलगाव बाजार शिवारात गुरुवारी (ता.२२) सकाळी ११:३० वाजेदरम्यान घडली. गंभीर जखमीस मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शेलगाव बाजार येथील अरुण भगवान तांदूळकर (४५) हे गुरुवारी गावातीलच गणेश खर्चे यांच्या शेतात काम करीत होते. दरम्यान अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या पायाला जबर दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. अरुण तांदुळकर यांनी आरडा-ओरड केल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजूरांनी घटनास्थळी धाव घेत  रानडुकराच्या तावडीतून त्यांची सुटका केली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संतोष तांदूळकर, भगवान झामरे, उत्कर्ष खर्चे आदींनी जखमीस तत्काळ उपचारासाठी मलकापूर येथील डॉ. कोलते यांच्या रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रानडुकराने भरदिवसा हा हल्ला केल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजुर व नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून गंभीर जखमी अरुण तांदुळकर यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची गरज
सध्या खरीप पेरणीची लगबग सुरु असल्याने शेतकऱ्यांसह मजूरांचा शेतशिवारात राबता आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांनी गावाकडे मोर्चा वळविल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. मागील पंधरवड्यात मोताळा वन विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर एस.टी. बसच्या धडकेत रोही ठार झाला. तर, गेल्या आठवड्यात एक रोही मोताळा शहरातील जिजाऊ नगरात भटकंती करताना आढळला होता. रानडुकरांसह वन्यप्राणी शेतीपिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजुर व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: buldhana news motala bison attack peasant injured