लोकसहभागातून बांधलेला बंधारा तुडूंब भरला; ग्रामस्थांनी केले बंधाऱ्याचे जलपूजन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नदीला आलेल्या पूरपाण्याने बंधाऱ्यात लाखो लिटर पाणी जमा झाल्याने दुष्काळाशी लढणाऱ्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. आज शुक्रवार (ता. १७) ला ग्रामस्थांनी या बंधाऱ्याचे जलपूजन केले. 

सटाणा : बागलाण तालुक्यात काल गुरुवार (ता. १६) ला झालेल्या जोरदार पावसामुळे औंदाणे (ता. बागलाण) व परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून हत्ती नदीवर बांधलेला बंधारा तुडूंब भरून वाहू लागला आहे. नदीला आलेल्या पूरपाण्याने बंधाऱ्यात लाखो लिटर पाणी जमा झाल्याने दुष्काळाशी लढणाऱ्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. आज शुक्रवार (ता. १७) ला ग्रामस्थांनी या बंधाऱ्याचे जलपूजन केले. 

औंदाणे व परिसराला दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. महिला, ग्रामस्थ व आबालवृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. पाणी नसल्याने शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हत्ती नदीवर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र शासन व लोकप्रतिनिधींकडून आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही होत नव्हती. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना होती.

ग्रामस्थांनी माघार न घेता लोकसहभागातून हत्ती नदीवर बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औंदाणे येथील शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश निकम, प्रगतीशील शेतकरी अभिजित निकम, मनोज निकम यांनी हा बंधारा बांधण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले. गावागावातून लोकवर्गणीद्वारे निधीचे संकलन करण्यात आले. यानंतर काम हाती घेऊन श्रमदानातून बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. 

यंदा पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले, मात्र पावसाने मोठी ओढ दिल्याने औंदाणे परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती जाणवत होती. हत्ती नदी कोरडीठाकच होती. काल (ता. १६) ला दिवसभर व रात्री झालेल्या दमदार पावसामुळे पठावे, दसाणे व जाखोड पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे हत्ती व कान्हेरी नद्यांना पूर आला आणि लोकसहभागातून बांधण्यात आलेला औंदाणे येथील बंधाराही तुडुंब ओसंडून वाहू लागला. या पाण्यामुळे परिसरातील शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. आज सकाळी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश निकम, अभिजित निकम, सरपंच सविता निकम, उपसरपंच विजया निकम यांच्या हस्ते बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले.

यावेळी सुनील निकम, गौरव निकम, नितीन निकम, समाधान तवर, गणेश निकम, प्रभाकर निकम, कैलास पवार, भरत पवार, अशोक निकम, देविदास निकम, नानाजी चव्हाण, सुरतसिंग पवार, महेंद्र निकम, प्रकाश गरुड, स्वप्नील निकम, सुमित निकम, तुळशीराम निकम, बाळू पवार, किशोर निकम, योगेश निकम, प्रवीण निकम आदी शेतकरी उपस्थित होते.

बंधाऱ्यात सोडलेल्या पाण्यामुळे गावाच्या परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा उद्भवही वाढणार असून पाण्याची टंचाई दूर झाली आहे. बंधाऱ्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे. - प्रकाश निकम, नेते, शेतकरी संघटना

 

Web Title: Bund in Baglan Satana is full