जड अंत:करणाने अन् थिजलेल्या नजरेने चालवली बागेवर कुऱ्हाड!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

गेली आठ वर्षे पोटच्या पोरासारखे झाडे सांभाळली. लाखोंचा खर्चही केला अन् आज मात्र त्याच्या जीवापाड जपलेल्या डाळिंबाच्या बागावर जड अंतकरणाने कुऱ्हाड चालवताना डोळे अक्षरशः थिजून गेले..

येवला : गेली आठ वर्षे पोटच्या पोरासारखे झाडे सांभाळली. लाखोंचा खर्चही केला अन् आज मात्र त्याच्या जीवापाड जपलेल्या डाळिंबाच्या बागावर जड अंतकरणाने कुऱ्हाड चालवताना डोळे अक्षरशः थिजून गेले..पाच एकरात जिकडे बघावे तिकडे तोडलेल्या डाळिंबाच्या झाडांचा ठीग नजरेत भरत होता आणि हे सगळं सांगताना कातरणी येथील भाऊसाहेब जाधवाचा स्वरही कातरत होता.यावर्षी दुष्काळाने शेतकऱ्यांवर यापूर्वी कधी नव्हे, अशी वेळ आणल्याने होत्याचे नव्हते होत पिके मातीमोल झाले.

उन्हाळ्याच्या दिवसात डाळिंबाची बाग जगविण्यासाठी शेततळे खोदले पण तेही यावर्षी कोरडेच राहिले. पाण्याअभावी शेतातच डाळिंबाच्या रोपांची पालापाचोळा झाला. आता ही रोपे मरणासन्न असल्याने उत्पन्नासाठी फायद्याची नाही म्हणून जाधव यांनी मोठ्या जड अंतकरणाने निर्णय घेत या पाच एकरातील सुमारे पंधराशे झाडांची जणू काही उघड्या डोळ्यांनी कत्तल केली..आज हे दृश्य त्यांचे मन हेलावून टाकत होते.२००१ मध्ये डाळींब रोपे,लागणीचा मजुरी, खर्च,खते ठिबक सिंचन आदि सर्वासाठी दोन लाखाचा खर्च करून त्यांनी बाग उभी केली होती. एक वर्षाने उत्पन्न सुरू झाल्यावर पहिल्या दोन वर्षात काहीसा आधार त्यातून मिळाला.मात्र पुढे कधी लाल्या रोगाचा प्रादुर्भाव तर कधी तेल्या भुरी रोगामूळे डाळींबाच्या उत्पादनात घट सुरु झाली. 

बाजाराभावाने नेहमीच सोबत कमी अन् दगाफटका अधिक केल्याने नफ्या तोट्याचा हा खेळ सुरूच राहिला. पाण्याच्या प्रश्न भेडसावू लागल्याने त्यासाठी दोन ते अडीच लाख खर्चून शेततळे देखील केले.मात्र गेल्यावर्षी आलेल्या वादळाने तळ्याचा कागद फाटला गेल्याने पुन्हा लाखो रुपये खर्चून नवीन कागद टाकायला लागला. एकीकडे डाळिंब या पिकाला भाव मिळत नव्हता तर उत्पादन खर्च मात्र आटोक्याबाहेर गेला होता.

मागील वर्षी भाव होता तर पिकाला पाणी देता न आल्याने उत्पादन शुन्यावर आल्याने मोठा फटका सहन करण्याची वेळी जाधव यांच्यावर आली. यावर्षी तर उभ्या झाडांचा पालापाचोला झाल्याने आता काही खरे नसल्याने बाग तोडून टाकण्याचा निर्णय जाधव यांनी घेतला. आजपासून त्यांनी उभी झाडे मुळापासून जेसीबीच्या मदतीने तोडली असून हि झाडे ट्रकटरच्या मदतीने जाळण्यासाठी घरी नेले तसेच इतरांना देऊन टाकले.

“वर्षानुवर्षे दरसवाडी,डोंगरगाव,मांजरपाडा प्रकल्प रखडलेले आहे.याचे काम पूर्ण झाले असते तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती.पाणीच उपलब्ध नसल्याने झाडे जागवण्याचा प्रश्नच होता.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाच्या बुंध्याला माठ ठेऊन पाणी देण्याचा सल्ला दिला. मात्र, आमच्याकडे माणसांना प्यायलाच पाणी नाही तेव्हा झाडाला पाणी देणार कसे.त्यामुळे नाईलाजाने डाळिंबाची सुमारे १५०० झाडे केवळ पाण्याअभावी तोडली. दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम या शासनाने करावे एवढीच अपेक्षा”.

- भाऊसाहेब जाधव, कातरणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burn Tree after heavy Loss from Agriculture