व्यवसायवृद्धीसह सामाजिक बांधिलकीही जपणे गरजेचे - चंद्रकांत पाटील

व्यवसायवृद्धीसह सामाजिक बांधिलकीही जपणे गरजेचे - चंद्रकांत पाटील

जळगाव - समाजात सरकारने काम करण्याला मर्यादा येत आहेत. त्यात कर वाढवू नका, यासोबत विविध सुविधाही मागितल्या जातात. परंतु सरकार कोणतेही असो. ते त्यांचे काम करत राहील. मात्र, विकासासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. जैन उद्योगसमूहाचा गाडा हाकताना भाऊंनी नेहमी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. त्यानुसारच सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे, असे मत महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

शहरातील काव्यरत्नावली चौकाजवळील जैन उद्योगसमूहाच्या माध्यमातून उभारलेल्या ‘भाऊंचे उद्यान-पद्मश्री डॉ. भवरलाल जैन थीम पार्क’चे लोकार्पण आज सायंकाळी झाले, याप्रसंगी ते बोलत होते. थीम पार्क व आर्ट गॅलरीच्या लोकार्पण सोहळ्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, किशोर पाटील, संजय सावकारे, उन्मेष पाटील, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, माजी आमदार सुरेशदादा जैन, महापौर नितीन लढ्ढा, जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपमहापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, महापालिका आयुक्‍त जीवन सोनवणे, कविवर्य ना. धों. महानोर, दलिचंद जैन आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की जळगावात १९८० ला पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आल्यापासून भवरलाल जैन यांच्याशी जोडले गेलेले संबंध जिवंत राहिले. तेव्हापासून त्यांचे काम पाहत आलो. मुळात आज कर्तृत्व आणि नम्रता यांचा संबंध कमी होत चालला आहे. परंतु या दोन्ही गोष्टी भवरलाल जैन यांनी जपल्याने त्यांचे कार्य मोठे झाले. आपला व्यवसाय वाढविताना त्यांनी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न कसे मिळविता येईल, या विचारातून त्यांनी सिंचनाच्या माध्यमातून क्रांती आणली. विकासाचे काम केवळ सरकार करेल या विचारात न राहता आपण समाजाशी काय करू शकतो, हे पाहणे आवश्‍यक आहे. 

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की भाऊंचे उद्यान ही चांगली संकल्पना शासन, महापालिका आणि जैन उद्योगसमूहाच्या माध्यमातून उभी राहिली. त्यामुळे जैन उद्योग हा कोणत्याही गोष्टीत मागे नसून विकासाचा विषय जेथे येतो तेथे जैन उद्योग मागे राहत नाही. त्यादृष्टीने ग्रामीण मतदारसंघातील बांभोरीतील दूषित पाण्याची समस्या दूर करण्याकरिता टाकी आणि पाइपलाइन करण्याच्या कामास जैन उद्योगाने होकार दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात ज्याप्रमाणे उद्यान झाले, तसे लहान का असेना तालुकास्तरावर ग्रामीण भागात उद्यान उभारण्यासाठी (जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून) प्रयत्न व्हावा.

माजी मंत्री-आमदार खडसे म्हणाले, की उद्यान साकारणे ही एक चांगली उपलब्धी झाली आहे. महापालिकेने साकारलेले उद्याने आज उद्‌ध्वस्त झाली आहेत. ती चांगली करण्याच्या दृष्टीने एखाद्या कंपनीकडे देखभालीसाठी द्यायला हवीत. माजी मंत्री सुरेशदादा जैन म्हणाले, की शहर सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने हे काम झाले आहे. महापालिकेच्या उद्यानांत देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने त्यांची दुरवस्था आहे. परंतु अशी कोणी संस्था जी केवळ उद्यानच नाही, तर रस्ते, लाइट यासाठी काम करण्यास तयार असल्यास महापालिकेच्या माध्यमातून त्यांना देण्याचा प्रयत्न होईल. महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्‍त केले. अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले.

पक्षविरहित विकास साधावा - गिरीश महाजन
जळगाव शहर अधिक सुंदर कसे करता येईल, यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न शासनस्तरावरून करण्यात येतील. विकासाच्या दृष्टीने लागणाऱ्या मदतीत कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला मोठे करण्याचे काम जिल्ह्याने केले असून, केवळ शहरच नव्हे; तर जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षविरहित काम साधायला हवे, असे मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मनोगतात व्यक्‍त केले.

दीडशे गावांचा कायापालट करू - अशोक जैन
अशोक जैन म्हणाले, की समाज हा सगळ्यांपेक्षा मोठा आहे, याच भावनेतून जैन उद्योगसमूह काम करत असून, येणाऱ्या पिढ्याही हे काम करत राहतील. जळगाव म्हणजे आमची जन्म आणि कर्मभूमी असून, केवळ शहरच नव्हे; तर जिल्हाही आमचाच आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यासाठी जे काही चांगले प्रोजेक्‍ट येतील तेथे कंपनीच्या ‘सीएसआर’च्या माध्यमातून काम करू. तसेच महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून दीडशे गावांची निवड करून त्यांचा कायापालट केला जाईल. यातील ९० गावे जळगाव जिल्ह्यातील राहणार असून, आगामी तीन वर्षांत हे काम जैन उद्योगसमूह करेल.

उद्यान झाले खुले
भाऊंचे उद्यान अर्थात डॉ. भवरलाल जैन थीम पार्कचा लोकार्पण सोहळा आज दिमाखात पार पडला. तीन एकर जागेत उभारलेले विविध सुविधांयुक्त हे उद्यान नागरिकांना आजपासून खुले झाले. सायंकाळी लहान मुलांनी येथे खेळण्याचा आनंद लुटला. यासोबत ज्येष्ठांचीही उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com