'व्यापाऱ्यांनो, मार्केट ‘कॅशलेस’साठी सहकार्य करा'

जळगाव - गोलाणी व्यापारी संकुलात मंगळवारी व्यापाऱ्यांना कॅशलेस व्यवहारासंदर्भात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल.
जळगाव - गोलाणी व्यापारी संकुलात मंगळवारी व्यापाऱ्यांना कॅशलेस व्यवहारासंदर्भात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल.

जळगाव - ‘कॅशलेस’ व्यवहार हे व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठीही फायदेशीर व पारदर्शक आहेत. लक्षावधी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापारी, दुकानदार हे माध्यम आहेत. जळगावमधील मार्केट मोठ्या उलाढालीचे केंद्र आहे. हे मार्केट ‘कॅशलेस’ करून ‘प्लास्टिक मनी’त पुढे न्यावयाचे आहे. त्यासाठी व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले.

येथील गोलाणी व्यापारी संकुलातील जिल्हा व्यापारी महामंडळाच्या सभागृहात आज या संकुलातील व्यापाऱ्यांसाठी कॅशलेस आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भात शिबिर घेण्यात आले, त्यात त्या बोलत होत्या.

महापौर नितीन लढ्ढा अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दामले, स्टेट बॅंकेचे सहाय्यक महाप्रबंधक अशोक गुप्ता, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, युसूफ मकरा, सुभाष कासट, अनिल कांकरिया, पुरुषोत्तम टावरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अग्रवाल म्हणाल्या, की व्यापारी आणि दुकानदारांनी आपल्या दुकानावर होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाणीसाठी ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ही सुविधा अत्यंत सोपी, फायदेशीर आणि स्वस्त आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी ही यंत्रणा आपल्या दुकानात कार्यान्वित करावी.

स्वॅप मशिनची माहिती
यावेळी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी ‘कॅशलेस’ आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात विविध उपाययोजनांची माहिती दिली. स्वॅप उपकरणांचे सादरीकरण केले. तसेच व्यापाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची समर्पक उत्तरेही दिली. व्यापारी असोसिएशनचे दिलीप गांधी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी स्वॅप मशिनचा स्वतःचा अनुभव सांगितला.

सरचार्ज कापू नका
स्वॅप कार्डद्वारे व्यवहार करताना बॅंकांतर्फे सरचार्ज कापला जातो. अगोदरच मोठ्या व्यवहारात मार्जीन कमी असते. आता स्वॅपद्वारे व्यवहार करताना सरचार्ज कापला गेल्यास फायदा अत्यल्प मिळतो. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना सरचार्ज न घेण्याविषयी सांगावे, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रशिक्षण
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फेही ‘कॅशलेस’ आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात अल्पबचत सभागृहात आज प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र संचालक, आपले सरकार सेवा केंद्र चालक आदींना सकाळच्या सत्रात, तर दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भात विविध उपकरणांची माहिती देण्यात आली. तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

युद्धपातळीवर एटीएम कार्ड देणार
ग्रामीण भागातील ग्राहकांकडे एटीएम कार्ड वा अन्य कार्ड नसल्याने ‘कॅशलेस’ व्यवहार कसे होतील? बॅंक अधिकाऱ्यांनी अगोदर ग्रामीण भागातील नागरिकांना एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्ड द्यावेत, तरच ग्राहक कार्ड घेऊन आमच्याकडे येतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यावर श्री. दामले म्हणाले, की जिल्ह्यातील सर्व बॅंकांना युद्धपातळीवर एटीएम वा अन्य कार्ड देण्याचे आदेश बॅंकांना दिले आहेत. ज्या ठिकाणी शक्‍यच नाही अशा ठिकाणी आधार कार्ड किंवा अंगठ्याच्या निशाणीवर ‘कॅशलेस’ व्यवहार करण्याची सुविधा देणार आहोत.

‘पिन’ नंबर कोणालाही देऊ नका 
‘कॅशलेस’ व्यवहार करताना आपला डेबिट, क्रेडिट, एटीएम कार्डाचा ‘पिन’ नंबर जपून ठेवावा. तो कोणालाही देऊ नये अन्यथा तुमचे कार्ड हरवले किंवा अनोळखी व्यक्तीने तुमच्या मोबाईलवर फोन करून मी अमुक बॅंकेतून बोलतो आहे, तुमचा एटीएम क्रमांक ब्लॉक झाला आहे, तो चेंज करायचा आहे तो क्रमांक द्या, असे सांगितल्यास आपला पिन क्रमांक देऊ नका. अन्यथा तुमच्या खात्यावरून दुसराच कोणी खरेदी करून घेईल, अशी माहिती स्टेट बॅंकेचे सहाय्यक महाप्रबंधक अशोक गुप्ता यांनी दिली.

रेशन दुकानांवर आता ‘स्वॅप’यंत्रे बसविणार
सर्वसामान्यांना रेशन दुकानांवर ‘कॅशलेस’ व्यवहार करण्यासाठी सर्वच रेशन दुकानांत ‘स्वॅप’ यंत्रे बसविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पत्रकारांना दिली. त्यासाठी लवकरच जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांची बैठक घेण्यात येईल. त्यांना ‘स्वॅप’ यंत्राबाबत मार्गदर्शन करून ती त्यांच्या दुकानात बसविण्याबाबत सांगण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना रोख रक्‍कम घेऊन रेशन दुकानांत जाण्याची गरज नसेल. आगामी एक किंवा दीड महिन्यात ही सुविधा कार्यान्वीत होईल. ग्रामीण भागातील नागरिकांना ही सुविधा दिल्यास ते अधिकाधिक ‘कॅशलेस’ व्यवहार करतील.  प्रभारी पुरवठा अधिकारी विलास हरीमकर यांनी सांगितले, की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये प्रत्येक रेशन दुकानदाराकडे ‘स्वॅप’ यंत्रे देण्यात येतील. जिल्ह्यात एक हजार ९२६ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांना याबाबत अगोदर ट्रेनिंग दिले जाईल. प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाही या योजनेची माहिती देण्यात येईल. जेणे करून त्यांना रेशन दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्यास सोयीचे होईल.

आधार कार्डावरूनही व्यवहार
ग्रामीण भागात अनेक नागरिकांकडे ‘एटीएम’ कार्ड, ‘स्वॅप’ कार्ड नाही, ते व्यवहार कसे करतील? असे विचारले असता श्री. हरीमकर यांनी सांगितले, की या ‘स्वॅप’ यंत्रात आता आधार कार्डावरूनही रेशनचे पैसे दिले जाऊ शकतील. यामुळे आधार कार्डावरूनही ‘स्वॅप’ केले जाईल. यामुळे संबंधित धान्य घेणाराच लाभार्थी आहे, याची खात्री पटेल.

पाच हजारांपेक्षा अधिक नवीन बचत खाते सुरू
जळगाव - दैनंदिन आर्थिक व्यवहारात ‘कॅशलेस’ व्यवहाराला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी प्रशासनाने विविध व्यापारी गट, समूहांना ‘कॅशलेस’ डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित केले आहे. ग्रामीण भागातही सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबवून ग्रामस्थांना डिजिटल आर्थिक व्यवहारांबाबत साक्षर केले जात आहे. ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता उपक्रमांतर्गत पाच हजारांपेक्षा नवीन बचत खाते सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. जिल्हा अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दामले यांनी ग्रामीण भागात नुकतेच आर्थिक साक्षरता शिबिर घेतले. सेंट्रल बॅंकेच्या वराड शाखेने नुकतेच पिंपळकोठा, एकलग्न येथे आर्थिक साक्षरता शिबिर घेतले. यावेळी ग्रामस्थांना ‘कॅशलेस’ व्यवहारांबाबत माहिती देण्यात आली. रूपे कार्डचे वितरण करण्यात आले. एकलग्न येथे ३७ जणांना रूपे कार्ड वितरीत करण्यात आले. या आयोजनासाठी सेंट्रल बॅंकेचे शाखाधिकारी ताकसांडे, सचिन देशमुख, सरपंच राजू बडगुजर आदींनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com