मंत्रिमंडळ विस्तार उद्या; आमदार डॉ. संजय कुटे यांची मंत्रिमंडळात वर्णी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे.

बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात आल्या होत्या, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कुटे यांच्या वाट्याला कृषि मंत्रिपद!
भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या तीन पंचवार्षिकपासून आमदार राहिलेले डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाध्यक्ष ते प्रदेश सरचिटणीसपद सांभाळले आहे. त्यांच्या राजकारणाला दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी उभारी दिली असून, राज्यातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यासू व निर्णयक्षमता असलेल्या नेत्यामधील मंत्री म्हणून भाऊसाहेबांचा वारसा नेण्यासाठी त्यांना कृषी मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

जिल्ह्यात आनंदोत्सव
गेल्या दीड ते दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव येताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. जळगाव जामोद येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून, चाहत्यांनी त्यांच्या घरी भेटी देऊन पेढे भरविले.

विस्तार लांबणीच्या अफवांना पूर्णविराम
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा नेमका कधी होणार? याबाबत सातत्याने 'तारीख पे तारीख' सांगण्यात येत होती. 14 जूनला विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर विस्तार होणार नाही, असे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते. परंतु, 'दैनिक सकाळ'ने प्रकाशित केलेल्या वृत्तात विस्तार 14 ते 16 दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विस्ताराचा मुहूर्त रविवार निश्‍चित केल्यामुळे लांबणीच्या अफवांवर आता पूर्णविराम लागला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आजपर्यंत अनेक वाटाघाटी आणि अडचणी आल्या. प्रत्येकवेळी मुहूर्त काढल्यानंतर तो विस्तार पुढे ढकलण्यात आल्याने अनेकदा मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदारांसह त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड होताना दिसून येत होता. मंत्रिमंडळात सामिल होण्यासाठी आधीपासून, भाजप सरकारच्या माध्यमातून होणार्‍या या अखेरच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे अनेक आमदार उत्सुक झाले होते.

मंत्रिमंडळात काँग्रेसच्या वाट्याला दोन मंत्रिपद जाण्याची शक्यता यापूर्वी वर्तविण्यात आली होती. मात्र, एक पदही त्यांच्या पारड्यात पडणे कठीण झाले आहे. तर दोन मंत्रिपदे शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून, यामध्ये एक राज्य आणि एक कॅबिनेट असू शकते. भाजपला चार मंत्रिपद मिळणार आहे. यामध्ये आता अनिल बोंडे, आशिष शेलार, डॉ. संजय कुटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित नावे अद्याप समोर आली नसली तरी, मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणार्‍या नेत्यांना त्यांच्या परिवारासह मुंबई येथील वर्षा बंगल्यावर कूच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet expansion tomorrow MLA Dr Sanjay Kute is in the Cabinet