मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी धडक मोहीम

मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी धडक मोहीम

गर्भलिंग निदान; गर्भपात करणाऱ्यांबाबत तक्रारीचे आवाहन, २५ हजारांचे बक्षीस

धुळे - मुलींचे घटते लिंग गुणोत्तर प्रमाण रोखण्यासाठी नियोजित उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जाईल. यात नियमांचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान, गर्भपात करणाऱ्यांविषयी गोपनीय माहिती दिल्यास खबऱ्यास २५ हजारांचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रमाण वाढावे
डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले, की जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण हे एक हजारी सरासरी ९२३ एवढे होते. ते फेब्रुवारी २०१७ मध्ये सरासरी ९११ होते. वास्तविक, हे प्रमाण सरासरी ९५० हवे. त्यामुळे महापालिका, जिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणारी सर्व रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रांची येत्या १५ एप्रिलपर्यंत धडक तपासणी मोहीम राबविण्यात येईल. त्याचा अहवाल शासनास सादर केला जाईल. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रात नियमांचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान, गर्भपात केला जात असेल, अशी माहिती कुणी दिली तर त्याला नाव गोपनीय ठेवून २५ हजारांचे बक्षीस दिले जाईल. 

तक्रार नोंदवा

बेकायदा, अनोंदणीकृत असलेल्या केंद्रांबाबत तक्रार  www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल. तसेच टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००२३३४४७५ यावर तक्रार नोंदविता येईल.जिल्हा शल्यचिकित्सकाच्या कार्यक्षेत्रात २६ सोनोग्राफी सेंटर कार्यान्वित असून, नऊ सेंटर बंद आहेत. या सेंटरची आर्थिक वर्षात चार वेळेस तपासणी करण्यात येते. कार्यक्षेत्रात २९ एमटीपी सेंटर आहेत. त्यांचीही तपासणी करण्यात येते. महापालिका कार्यक्षेत्रात ९१ सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ६४ कार्यरत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात ११ केंद्रे बंद आहेत. १६ केंद्रे कायमस्वरूपी बंद आहेत. यापैकी कार्यरत व तात्पुरते बंद केंद्रांना एमआरसी क्रमांक देण्यात आल्याचे  सांगण्यात आले.

योजनेची माहिती द्या
पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करताना विविध उपक्रमांची माहिती जनतेला देताना, जागृती करताना साक्षीदारांना सहाय्य, खबऱ्या योजना, सावित्रीबाई फुले योजनेची माहितीही दिली जावी. ‘डिकॉय’ केस मिळण्यासाठी जनतेला आवाहन करावे, अशी सूचना सरकारने दिली आहे. 

म्हैसाळ, नाशिकमधील घटनेनंतर...
म्हैसाळ (मिरज) येथे डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या अनोंदणीकृत भारती हॉस्पिटलमध्ये गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला, ओझर (ता. निफाड, जि. नाशिक) येथे गर्भलिंग निदानातून डॉ. बी. एम. शिंदे यांनी गर्भपात केल्याचे उजेडात आल्यानंतर सरकारने विविध स्वरूपाची कारवाई करण्याची सूचना प्रत्येक जिल्हास्तरावर दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com