बाजार समितीच्या पुढाकाराने सुरु होणार छावण्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मे 2019

येवला : तालुक्यात माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच जनावरांना देखील चारा पाणी मिळणे दुरापास्त बनले आहे. या गंभीर प्रश्नाकडे इतके दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असले तरी आता चारा छावण्या सुरू करण्याला प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार असून तहसील प्रशासनाने प्रस्ताव मागवले आहे.

येवला : तालुक्यात माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच जनावरांना देखील चारा पाणी मिळणे दुरापास्त बनले आहे. या गंभीर प्रश्नाकडे इतके दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असले तरी आता चारा छावण्या सुरू करण्याला प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार असून तहसील प्रशासनाने प्रस्ताव मागवले आहे.

तालुक्यात अल्पपावसामुळे दुष्काळाचे यावर्षी टंचाईची दाहकता भयानक आहे. पालखेड लाभक्षेत्रात किमान पिण्याचे पाण्याची गरज भागत आहे मात्र, दुष्काळी अवर्षणप्रवण उत्तर-पूर्व भागात माणसांना प्यायला पाणी मिळत नसल्याने जनावरांची प्रचंड हाल सुरू आहे. पिण्याच्या पाण्यातच काटकसर करून लोक टँकरचे पाणी जनावरांना देत आहे. अंदरसूल, उंदीरवाडी आदि भागात पशुपालकांनी प्लॅस्टिक कागद टाकून छोटे तळे तयार केले. त्यात टंकरने विकत पाणी घेऊन जनावरांची तहान भागवत असल्याचेही चित्र आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी गेल्या महिन्यापासून तहसीलदारांकडे सुरू होती. उंदिरवाडी, नगरसुल, ममदापूर, राजापूर आदी भागातून पत्रही दिले गेले होते पण याकडे इतके दिवस दुर्लक्ष झाले.

दोन दिवसांपूर्वी आमदार छगन भुजबळ यांनी तालुक्यातील दुष्काळी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना तंबी दिली त्यातच त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांचीही भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. तहसीलदारांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देऊन दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या भागात छावण्या सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा व त्यासाठीचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवावेत असे पत्रात म्हटले आहे. बाजार समिती संचालक मंडळाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असली तरी, चारा छावणी सुरु करण्यासाठी बाजार समितीने तयारी दर्शविली असल्याचे सभापती उषाताई शिंदे यांनी सांगितले. पूर्व भागातील स्थिती भयावह पाहता छावण्या सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे जनावरांच्या चारापाण्याचे मोठी चिंता दूर होणार असून प्रशासनाने याप्रश्नी वेळेत व लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

“यावर्षी दुष्काळात तीव्रता १९७२ सारखी भयानक आहेत. उत्तर-पूर्व भागात तर दोन-पाच किलोमीटर फिरूनही थेंबभर पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे छावण्या सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती. पशुपालकांची मागणी व परिस्थितीची दाहकता लक्षात घेऊन थेंबभर पाण्याची पंचायत असलेल्या अंदरसुल, राजापूर, नगरसुल परिसरात छावण्या सुरू करण्याला प्राधान्य देण्यात यावे.”
- किशोर दराडे, आमदार

“दुष्काळात शेतकऱ्यांची होणारी होरपळ बघून छावण्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. सद्यपरिस्थितीत उत्तर-पूर्व भागात भयानक पाणी व चारा टंचाई असल्याने या भागात सर्वाधिक टंकर सुरु आहेत. या भागारून छावण्याची मागणी होत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त परिसरात छावण्यांसाठी चाचपणी करून निर्णय घेतला जाईल.” 
- माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला

Web Title: The camps will start due to market committee's initiative