उमेदवारांनो, व्हॉट्‌सऍप, फेसबुक वापरा, पण जपून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नाशिक - अँड्रॉइड फोनवर तयार झालेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या होणाऱ्या प्रचाराला निवडणूक आयोगाने वेसण घातले आहे. यापुढे आपण कुठल्या प्रकारचा मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना पाठवत आहोत, याबाबतचे प्रमाणपत्र मिळविल्याशिवाय मजकूर पाठविता येणार नाही. तसे आढळून आल्यास उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर थेट आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्याचे फर्मान निघाले आहे. फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियाचासुद्धा त्यात समावेश करण्यात आल्याने सर्वसामान्य मतदारांना मात्र हायसे वाटले आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी मतदारांचे अर्ज भरण्यास अजून अवधी आहे. राजकीय पक्षांकडून इच्छुकांची यादी अजून जाहीर झाली नसताना शहरात महापालिका निवडणुकीचा प्रचार जोमात आला आहे. त्यात सोशल मीडियाच्या माध्यमाचा जोरदार वापर केला जात आहे. त्यात व्हॉट्‌सऍप व फेसबुकच्या माध्यमातून सहज मतदारांपर्यंत पोचता येत असल्याने अगदी गुडमॉर्निंगपासून गुड नाइटपर्यंतच्या संदेशांची जोरदार फेकाफेक होत आहे. दृश्‍य स्वरूपात होणाऱ्या प्रचारावर निर्बंध असले, तरी व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातूनही होणाऱ्या प्रचारावर नियंत्रण आणण्यासाठी आयोगाने या निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर निवडणुकीशी संबंधित किंवा मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कुठलीही पोस्ट टाकण्यापूर्वी महापालिकेच्या आचारसंहिता कक्षातून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे, असे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. 

तक्रारींसाठी व्हॉट्‌सऍप क्रमांक 

निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून महापालिकेने आचारसंहिता कक्षाची स्थापना केली आहे. उपजिल्हाधिकारी सरिता नरके यांची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यासाठी व्हॉट्‌सऍप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. 7768002424 असा व्हॉट्‌सऍप क्रमांक आहे. शिवाय 0253-2577546 या क्रमांकावरही तक्रार करता येईल.

Web Title: Candidates use Facebook, whatsapp but keep