मारहाणप्रकरणी आरोपीला वर्षाची सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

आरोपी राजाराम नामदेव रानडे (50, रा. वांगणी, ता. पेठ, जि. नाशिक) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 1 वर्षाची सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

नाशिक - जुन्या वादाची कुरापत काढून मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या इसमाला कुऱ्हाडीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी राजाराम नामदेव रानडे (50, रा. वांगणी, ता. पेठ, जि. नाशिक) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 1 वर्षाची सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. 

सदरची घटना 30 ऑक्‍टोबर 2016 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास वांगणी (ता. पेठ) येथे घडली होती. चिंतामण गोविंद हिरकुडे (रा. वांगणी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील गोविंद लक्ष्मण हिरकुडे हे घराबाहेर ओसरीमध्ये झोपलेले असताना, संशयित राजाराम रानडे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून गोविंद हिरकुडे यांना अंथरुणासह बाहेर ओढत नेले. त्यानंतर त्याने कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करून जखमी केले होते. याप्रकरणी पेठ पोलिसात भादंवि 307, 326 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. सरकारी पक्षातर्फे वकील शिरीष कडवे यांनी 10 साक्षीदार तपासले असता, त्यानुसार आरोपी राजाराम रानडे याच्या विरोधातील गुन्हा साबीत झाला. यावेळी न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे आरोपी रानडे याने, आपणास 7 मुले असल्याचे सांगत द्या याचना केली. त्याची दखल घेत, न्या. शिंदे यांनी त्यास 1 वर्षांची सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In the case of assault the accused has been punished of servitude