Dhule Crime News : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसपाटील पतीसह चौघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Dhule Crime News : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसपाटील पतीसह चौघांवर गुन्हा

शिरपूर (जि. धुळे) : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून टेकवाडे (ता. शिरपूर) येथील पोलिसपाटील पतीसह चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (case been filed against 4 people including policemen husband in case of suicide of married woman dhule news)

पाळण्याच्या दोरीने गळफास

टेकवाडे येथील रोहिणी अतुल शिरसाट (वय २७) हिने सोमवारी (ता. २७) सायंकाळी राहत्या घरात बाळाच्या पाळण्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तिला शांतिलाल शिरसाट यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

माहेरचे लोक पोलिस ठाण्यात

दरम्यान, रोहिणीच्या मृत्यूची माहिती मिळताच अलखेडा (पाडळदा, ता. शहादा) येथील तिच्या माहेरची मंडळी तातडीने शिरपूरला पोचली. त्यांनी पोलिस ठाणे गाठून निरीक्षक ए. एस. आगरकर यांची भेट घेतली. सासरी छळ सुरू असल्याने रोहिणीने आत्महत्या केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

भावाने दिली फिर्याद

रोहिणीचा भाऊ रवींद्र हिलाल रामराजे (रा. अलखेडा) याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २०२० मध्ये रोहिणीचा विवाह अतुल शिरसाट याच्यासोबत झाला होता. कोरोनाकाळात विवाहास मोजकेच लोक हजर होते. त्यामुळे लग्नात जास्त आहेर, भांडी मिळाली नाहीत. लग्नाला दहा दिवस उलटत नाहीत तोच सासूने तिला टोमणे मारण्यास सुरवात केली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ती गरोदर असताना घरकामावरून, तसेच माहेरून उपचारासाठी पैसे आणावेत अशा कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्याविरोधात तिने २०२१ मध्ये पोलिसांत तक्रार दिली होती.

२०२२ मध्ये घरकुल मंजूर झाल्यानंतर ते बांधण्यासाठी माहेरून पैसे आण, अशी मागणी तिच्याकडे करण्यात आली. २६ मार्चला डोंगराळे (ता. मालेगाव) येथे बहिणीकडे धार्मिक कार्यक्रमासाठीही तिला जाऊ दिले नाही. तिचा वारंवार छळ करून सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसपाटलासह चौघांवर गुन्हा

रवींद्र रामराजे याच्या फिर्यादीवरून संशयित पती तथा टेकवाडे येथील पोलिसपाटील अतुल राजेंद्र शिरसाट, दीर राकेश शिरसाट, सासू सुनंदा शिरसाट व सासरे राजेंद्र शिरसाट यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.