येवला बाजार समितीत शेतमालाचे पैसे २४ तासांत मिळणार रोख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेत काल पासून शेतमाल विक्री झाल्यावर रोखीने पेमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 
धनादेश वटणावळ व बँकांच्या शुक्लकाष्टातून शेतकऱ्यांची सुटका होणार असून शेतमाल विक्री झाल्यावर पैसे हातात पडणार आहेत.

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेत काल पासून शेतमाल विक्री झाल्यावर रोखीने पेमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 
धनादेश वटणावळ व बँकांच्या शुक्लकाष्टातून शेतकऱ्यांची सुटका होणार असून शेतमाल विक्री झाल्यावर पैसे हातात पडणार आहेत.

केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयापासुन बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारावर शेतीमाल विक्रीनंतर शेतमालाचे पेमेंट धनादेशाने अदा करण्यात येत होते.
शेतमालाचा मोबदला धनादेशाने मिळाल्याने एक तर बँकांच्या अडचणी आणि त्यात
धनादेश वटण्यास लागणारा १५ दिवस ते महिन्या भरापर्यत उशीर होत असल्याने 
शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रारी दाखल केलेल्या होत्या. त्यामुळे १९ मार्चला झालेल्या बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला होता.

ठरल्याप्रमाणे बाजार समितीचे पदाधिकारी व येवला, अंदरसुल मर्चंट्‌स असोसिएशनचे सभासदाची संयुक्त बैठक झाली. यावेळी बाजार समितीच्या येवला मुख्य आवारात व उपबाजार अंदरसुल आवारावरील कांदा, मका व भुसारधान्य शेतीमालाचे पेमेंट रोख स्वरुपात अदा करणेबाबत निर्णय झाला आहे.

शेतमाल विक्री केला की मिळणाऱ्या पैशातून शेतीला भांडवल, रोजदारी वाटप, घरगुती खर्च अशा अनेक गोष्टीसाठी हे पैसे खर्च करावे लागतात. मात्र धनादेशामुळे हे सगळे गणित विस्कळीत होऊन गरजा भागवण्यासाठी उसनवारीसह कर्ज घेण्याची वेळ येत होती. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या आर्थिक अडचणीचे दुखणे थांबणार आहे.

शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल विक्रीनंतर शेतमालाचे पेमेंट संबंधित व्यापाऱ्याकडुन २४ तासाचे आंत रोख स्वरुपात घेऊन जावे व धनादेश स्विकारु नये. पेमेंटबाबत काही तक्रार असल्यास बाजार समिती कार्यालयात तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे, उपसभापती गणपत कांदळकर, सचिव डी. सी. खैरनार व संचालक मंडळाने केले आहे.  

Web Title: Cash will be available in Yeola market committee within 24 hours